महागावमध्ये महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थी भविष्यातील देशाचे सुजाण नागरिक आहेत. त्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती शालेय वयातूनच होणे गरजेचे आहे. बँकिंग क्षेत्रात बदलत्या तंत्रज्ञानामुळे नवनवीन आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रणाली तयार झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे बँकिंग क्षेत्रातील व्यवहाराचे ज्ञान शालेय वयातच होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन व्यापारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर दशरथ पाटील यांनी केले.
महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यापारी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रभेट प्रसंगी मार्गदर्शन केले. यामध्ये ' फाली ' संस्थेच्या उपक्रमांतर्गत ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे नियोजन समन्वयक प्रथमेश शेळके यांनी केले.
पाटील यांनी यावेळी बँकिंग कायदा, बँकिंग क्षेत्रात कृषी अधिकाऱ्यांची गरज, तसेच त्यांना संस्थेतील आर्थिक व्यवहार,कर्ज पुरवठा, वेगवेगळ्या ठेव योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, लॉकर सुविधा तसेच संगणक प्रणालीद्वारे केले जाणारे आर्थिक व्यवहार यांची माहिती दिली.
या उपक्रमास संस्थाध्यक्ष शंकरराव पाटील यांची प्रेरणा, प्राचार्य आय.एस. पाटील,संस्था प्रतिनिधी प्रा. डी.एस.पाटील, आणासाहेब पाटील, पर्यवेक्षक अशोक नांदुलकर यांचे मार्गदर्शक लाभले. यावेळी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.



