नौकुड ग्रामपंचायतीचे उपवनसंरक्षकांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड वनक्षेत्र हद्दी लगतच्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून तसेच जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी वन विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नौकुड येथील ग्रामस्थांची शेती ही वन क्षेत्रालगत आहे. वनहद्दी लगत शेती असल्याने जंगली प्राण्यांच्या वावरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वनक्षेत्र व शेती यात कोणतेच कुंपण किवा खंदक नसल्याने तसेच वनक्षेत्रात व त्या लगत असणारे पाण्याचे तलाव बंद स्थितीमध्ये असल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलातून येत थेट शेतीचे नुकसान करत आहेत.
तसेच दरवर्षी जंगलाला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जंगलाचे नुकसान व प्राणीमात्राना त्रास होत आहे. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गावठाण व वनक्षेत्र यांच्या मधील जाळपट्टे काढणे गरजेचे आहे. त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान व वन्यप्राणी यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही. सदर वनपरिक्षेत्रात गवा, कोल्हा, रानडुकर, साळींदर इत्यादी प्राणी सतत गावालगत फिरत असतात. तसेच विविध जातीचे वृक्ष, अनेक पशुपक्षी, प्राणी आहेत.
नोव्हेंबर महिन्यात गावठाण व वनक्षेत्र यांच्या मधील जाळपट्टे न काढल्यामुळे वृक्षसंपदा होरपळून गेली आहे. जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे पशुपक्षी, कीटक, प्राणी यांची अन्नसाखळी धोक्यात आली आहे. तसेच वरून उन्हाच्या झळा आणि खालून वणव्याची धग यामुळे होरपळेलल्या झाडांना पाण्याची गरज आहे.
वनविभागाकडून तात्काळ वनविभाग क्षेत्रातील दोन पाझर तलाव दुरुस्त करावेत व वनक्षेत्र आणि शेती यांच्यामध्ये खंदक खोदुन द्यावे. तसेच दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गावठाण व वनक्षेत्र यांच्यामधील जाळपट्टे काढावे त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान व तेथील प्राणी यांच्या जीविताला हानी होणार नाही. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

