सिंबायोसिस स्कूल हरळी बु.येथे विज्ञान शिक्षक उद्बोधन कार्यशाळा संपन्न
![]() |
| हरळी बुद्रुक : प्रत्यक्ष प्रयोगाच्या सादरीकरणातून विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देताना हेमंत लागवणकर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवत असताना प्रयोगशाळा नाही किंवा प्रयोग करण्यासाठी साहित्य नाही म्हणून खंत न करता वर्गातच काही ठराविक उपलब्ध रसायनांचा वापर करून शिक्षकांनी विज्ञान शिकवावे त्याचबरोबर एखादा प्रयोग केवळ विद्यार्थ्यांना दाखवून शिकवता येणार नाही तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना तो करायला लावणे गरजेचे आहे अन्यथा तो प्रयोग जादूचा ठरेल त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगातून त्याच्या निष्कर्षातून विज्ञान सांगणे आवश्यक आहे असे प्रतिपादन विज्ञान प्रसारक व शैक्षणिक सल्लागार हेमंत लागवणकर यांनी केले
सिंबायोसिस स्कूल हरळी बु.येथे शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, विज्ञान शिक्षक कोल्हापूर आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय विज्ञान शिक्षक उद्बोधन कार्यशाळेत बोलत होते.
श्री. लागवणकर पुढे म्हणाले, समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे काम हे विज्ञान शिक्षकच करू शकतात. त्यामुळे प्रयोगशाळेत वापरले जाणाऱ्या रसायनांच्या पासून जल प्रदूषण व भूप्रदर्शन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील स्वयंपाक घर ही देखील एक प्रयोगशाळाच असून उपलब्ध पदार्थांच्या सहाय्याने घरच्या घरी सोपे-सोपे प्रयोग करून विद्यार्थी विज्ञान समजू शकतात.
दोन टप्प्यात कार्यशाळा पार पडली. गडहिंग्लज तालुक्यातील जवळपास शंभरहून अधिक विज्ञान शिक्षकांनी यात सहभाग घेतला. या कार्यशाळेत लागवणकर यांनी सोप्या पद्धतीने प्रयोग करत मुलांना आवडेल असे विज्ञानाचे अध्यापन कसे करता येईल व सुलभतेने प्रयोग कसे करता येतील याची माहिती दिली. यावेळी श्रीशैल मठपती, ओंकार कुलकर्णी, राजेश पिष्टे, प्रशांत पाटील, महागाव केंद्रप्रमुख अनिल बागडी, जे. डी. पाटील. अण्णासाहेब दिवटे, राजाराम माने, दिपक सावंत, श्रीधर खोराटे यांच्यासह महाराष्ट्र विज्ञान मंडळ, कोल्हापूर जिल्हा विज्ञान समिती पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थितीत होती.
या कार्यशाळेचे औचित्य साधून हेमंत लागवणकर आणि सिंबायोसिस शाळेच्या मुख्याध्यापपदी निवड झाल्याबद्दल वहिदा मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुरळीत पार पडली. या कार्यशाळेसाठी सिंबायोसिसच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला समन्वयक अनंत भोगण,अतुल अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

