गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.एस.एम-कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक व लिंगायत संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष बसवराज आजरी होते.
प्रांरभी स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जयकुमार सरतापे यांनी केले. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्षा अरुणाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आंले. यावेळी संस्थेचे संचालक बसवराज आजरी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी समतेचे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची प्रचिती संपूर्ण जगाला आलेली आहे. त्याकाळी त्यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकाच छताखाली आणण्याचे महान कार्य केले.
महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकामध्ये लोकशाहीचा पाया मजबूत केला. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा या थोर महामानवाला अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन केले.
यावेळी जंगम समाजाचे तालुकाध्यक्ष महेश तुरबतमठ यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रा. संकेत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.



