गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणीतील श्री.महालक्ष्मी व श्री. करनाईक देवाची यात्रा दिनांक २ ते ६ मे या कालावधीत होत आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच करवीर उथळे होते. यावेळी ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर उपस्थित होते.
यात्रा सुरळीत व शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने तसेच यात्रेदरम्यान ग्रामस्थांची व बाहेरगावावरून येणाऱ्या पै पाहुण्यांची गैरसोय होऊ नये याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीने काही निर्णय घेतले आहेत.
यामध्ये घरातील घनकचरा, ओला कचरा तसेच प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून ठेवण्याचे आहे. ज्यावेळी कचरा गाडी येईल त्यावेळी त्यात टाकावा. इतर कुठेही टाकू नये, आपल्या घरातील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीस अडथळे (उदा. खडी, वाळू, दगड, विटा व इतर साहित्य) लवकरात लवकर काढून घ्यावे, रस्त्यावर वाहतुकीस अडचण होईल असे कोणतेही काम करू नये, वाहतुकीस सर्व रस्ते मोकळे राहतील याची सर्वांनी दखल घ्यावी, गावातील सर्व घरामध्ये एलईडी बल्ब वापरण्यात यावे, यात्रेनिमित्त हॅलोजन, साधे मोठे बल्ब वापरू नये, गावातील व बाहेरील येणारे सर्व दुकानदार यांनी देखील आपल्या दुकानात एलईडी बल्बचा वापर करावा, सर्व नळांना तोट्या बसून घेणे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, गावात डिजिटल बोर्ड लावण्यासाठी ग्रामपंचायतीचा परवाना घेणे बंधनकारक राहील, डिजिटल बोर्ड साठी किमान 200 रुपये किंवा 2 रुपये पर स्क्वेअर फिट प्रमाणे जी रक्कम मोठी होईल त्याप्रमाणे कर आकारण्यात येईल, सर्व ग्रामस्थांनी यात्रेच्या काळात आपली वाहने सार्वजनिक ठिकाणी पार्क करू नये, आपल्या वैयक्तिक जागेतच पार्क करावीत, यात्रेनिमित्त येणाऱ्या बाहेरील वाहनांसाठी जी जागा पार्किंगसाठी नियोजित करून दिलेली आहे त्याच जागेत पार्किंग करावे. अन्यथा दंड आकारण्यात येईल. आदी निर्णय यावेळी घेण्यात आले. या बैठकीस सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

