![]() |
| गडहिंग्लज : रमजान ईद निमित्त येथील ईदगाह मैदानावर नमाज पठाण करताना मुस्लिम बांधव. (छायाचित्र: मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला. हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याची परंपरा अखंडित ठेवली आहे. रमजान ईद, शिव- बसव जयंतीनिमित्त हिंदू- मुस्लिम बांधवांमध्ये एकोप्याचे दर्शन झाले.
येथील वडरगे रोडवरील ईदगाह मैदानावर सात हजार पेक्षा जास्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी मौलाना मेहमूद रजा यांनी कुराण पठण केले. नमाज पठणानंतर सामाजिक सलोखा, शांतता, बंधुता, सुख समृद्धी यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी सर्वांना पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच 'आम्ही भारतीय गडहिंग्लजकर' यांच्यावतीने डॉ.एम.एस.बेळगुद्री, अरविंद बारदेस्कर, माजी प्राचार्य सुभाष पाटील, महेश आरभावी, साताप्पा कांबळे, वसंतराव यमगेकर, सिद्धार्थ बन्ने, महावीर दसूरकर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' हे गीत ईदगाह मैदानावर सादर करून राष्ट्रसेवा दलाचे गणपतराव पाटोळे, सुरेश दास, प्रा. शिवाजीराव होडगे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवजयंती व महात्मा बसवेश्वर जयंती मुस्लिम बांधवांनी साजरी केली. यावेळी मुन्ना सय्यद, सिकंदर यळकुद्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रा. अशपाक मकानदार, इर्शाद मकानदार, एम. एस. बोजगर, रफिक पटेल, नूर अत्तार, राजू खलिफ यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार युनूस नाईकवाडे यांनी मानले.





