ठाकरे गट शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चुकीच्या पद्धतीने तपास करून अपंग बांधवांचे बंद करण्यात आलेले पेन्शन तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ तर अंध, अपंग, अनाथ, विधवा महिला, परितक्त्या, गंभीर आजार अशा लोकांसाठी संजय गांधी नावाची योजना राबवून दर महिना औषधे, पोटभर अन्न मिळावे ह्या हेतूने दर महीना एक हजार रुपये पेन्शन दिली जाते. त्यामुळे निराधार लोकांना फार मोठी मदत मिळत असते पण गेल्या तीन महिन्यापूर्वी गडहिंग्लज संजय गांधी कार्यालयाने गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील संजय गांधी लाभार्थी आहेत त्या लाभार्थींची मुले 25 वर्षांची झाली आहेत, मुलगा सरकारी नोकरीत आहे, मुलगा मिळवता झाला आहे अशा पद्धतीचे नियम दाखवून 200 लोकांचे पेन्शन बंद केले आहे.
चुकीच्या पद्धतीने सदर तपासणी केली आहे. त्यामध्ये मुलाचे वय 22 असताना देखील पंचवीस वर्षे दाखवले आहे. तसेच शंभर टक्के अपंग लोकांना हयात असेपर्यंत पेन्शन सुरू ठेवण्याचे शासनाचे नियम असताना देखील त्यांची पेन्शन बंद केल्याने निराधार लोकांना मोठा धक्का बसला आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. निराधार, अपंगांचे पेन्शन सुरू करण्यात यावे अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
सदर मागणीची निवेदन गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्यासह युवा सेना सोशल मीडिया समन्वयक शकील मुल्ला शिवसेना शाखाप्रमुख वैभव खोडवे यांच्यासह शिवसैनिक जय मगदूम, अखिब नाईकवाडे, पृथ्वीराज पाटील यांनी दिले आहे.

