Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कष्टकऱ्यांचे जगण्याचे सर्व प्रश्न सुटले पाहिजेत: सुभाष लोमटे

गडहिंग्लजला 'पश्चिम महाराष्ट्र सामाजिक न्याय व सलोखा परिषद'



                             (छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी): कष्ट करून पोट भरणाऱ्या समाजातील विविध जाती धर्मातील जनसमूहांचे जगण्याचे सर्व प्रश्न सुटले पाहिजेत. त्यांचे जगणे सुसह्य झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.असे प्रतिपादन एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे सचिव सुभाष लोमटे यांनी केले.




राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त गडहिंग्लज येथे एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशन व सर्व समविचारी संघटना यांच्यावतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्र सामाजिक न्याय व सलोखा परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. संतोष मस्के होते. यावेळी  माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, ज्येष्ठ संविधान अभ्यासक प्रा. सुरेश सावंत, जे. बी. बारदेस्कर, प्रा. तनुजा शिपुरकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांची प्रमुख उपस्थिती होती.




यावेळी बोलताना श्री. लोमटे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे लोकहिताचे विचार सर्वत्र पोहोचणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा परिषदेच्या माध्यमातून या विचारांचा जागर व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे संविधानाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. सामाजिक सलोखा परिषदांद्वारे प्रत्येक गावागावात या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. समाजातील कष्ट करून पोट भरणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील जनसमूहाचे जगण्याचे सर्व प्रश्न सुटणे आवश्यक आहेत. सध्या जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात असून, हे देशाच्या अखंडतेसाठी घातक आहे. यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येत आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी एकत्र येऊन एकोपा कसा टिकवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, माजी आमदार ॲड.श्रीपतराव शिंदे, प्रा. तनुजा शिपुरकर, ॲड. संतोष मस्के यांनीही मार्गदर्शन केले.






यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या परिषदेस प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. बाळासाहेब मुल्ला, गणपतराव पाटोळे, माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, प्रा.पी. डी.पाटील, प्राचार्य साताप्पा कांबळे, बाबासाहेब नदाफ, सामाजिक कार्यकर्ते रमजान अत्तार, बाळासाहेब मोरे यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रा.पी.डी. पाटील यांनी केले. आभार बाळेश नाईक यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.