Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुलाबाळांसह त्याने मांडला उघड्यावरच संसार

 निवाऱ्यासाठी हरळी बुद्रुकच्या तानाजी गुरव यांची आर्त हाक


न्यायासाठी 25 मे पासून करणार उपोषण 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी बुद्रुक येथील तानाजी हरी गुरव यांच्यावर 'कुणी घर देता का घर' असे म्हणण्याची वेळ आली आहे. पडक्या जुन्या घराच्या भिंती केव्हा कोसळतील याचा नेम नाही. भाड्याने घर घ्यावे म्हटले तर प्रतिकूल परिस्थितीमुळे ते शक्य नाही. त्यामुळे त्यांनी पत्नी व मुलाबाळांसह आपला संसार  उघड्यावरच मांडला आहे. दरम्यान, आपल्याला न्याय मिळावा व निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी आता तानाजी गुरव यांनी शासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. न्याय न मिळाल्यास दिनांक 25 मे पासून गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी निवेदनही सादर केले आहे.



या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  हरळी बुद्रुक येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत धोकादायक पडक्या घरात राहत असल्याने जीवितास धोका आहे, त्यामुळे घराबाहेर उघड्यावर मुलाबाळांसह राहत आहे. पावसाळ्यापूर्वी निवाऱ्याची सोय झाली नाही तर मला मुलांसह मंदिर किंवा गावातील गाव चावडीचा आधार घ्यावा लागणार आहे. माझे राहते घर सन 2016 -17 च्या अतिवृष्टीमध्ये पडले आहे. त्यामुळे सहा वर्षापासून मी भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. चालू वर्षी गावची यात्रा तेरा वर्षांनी झाली त्यामुळे घर मालकांना घर खाली करून द्यावे लागले आहे. सध्या दुसरे घर भाड्याने घेऊन राहण्याची माझी परिस्थिती नाही. मी शेतमजूर असून माझी तीन मुले शिक्षण घेत आहेत. सन 2016-17 च्या अतिवृष्टीमध्ये पंचनामा झालेला आहे परंतु अद्याप निवाऱ्याची सोय झाली नाही. 


माझ्या वडिलांच्या नावे असणाऱ्या पडक्या घराला वारस लावण्यासाठी अर्ज केला असून त्याची अंमलबजावणी व्हावी. न्याय मिळावा व निवाऱ्याची सोय व्हावी. अन्यथा दिनांक 25 मे पासून  कुटुंबीयांसह गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.