विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तळमळीने काम करा
वाढदिवसानिमित्त आमदार राजेश पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमात हार तुऱ्या ऐवजी शैक्षणिक साहित्याला प्राधान्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जनतेचा विश्वास आणि पाठबळामुळे मला आमदार पदाची संधी मिळाली आहे. या विश्वासाला पात्र राहण्यासाठी जनतेचा सेवक या नात्याने मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटत राहीन अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.
महागाव (तालुका गडहिंग्लज) येथे ५६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा समारंभात आमदार राजेश पाटील बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार होते. यावेळी गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, चंदगड तालुकाध्यक्ष अध्यक्ष भिकू गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध संस्था, कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार राजेश पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे, बुके आणण्याऐवजी शालेय उपयोगी साहित्य आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्य आणले होते. प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्याला या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले, मतदारसंघातील जनतेच्या पाठबळामुळे विकास कामांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणता आला. आतापर्यंत ५१३ कोटींची विकास कामे झाली आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात आला. रस्ते, पाणी, वीज यासह आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढे देखील विकास कामांसाठी सदैव माझा प्रयत्न राहील. वाढदिवसाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेने दिलेल्या शुभेच्छा या मला पुन्हा विकास कामे जोमाने करण्यासाठी पाठबळ व प्रेरणा देतात असे सांगून जनतेचे त्यांनी आभार मानले.
राज्यात आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार व चंदगड मतदारसंघाला लाल दिव्याची गाडी हे स्वप्न उरी बाळगून कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले. यावेळी राजेश पाटील- औरनाळकर, प्रकाश पाटील, बाळू चौगुले, आर एस पाटील, शिवानंद हुंबरवाडकर, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, माजी जि प सदस्य शिवप्रसाद तेली, संगीता पाटील, आजरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, माजी सभापती अमर चव्हाण, मुकुंद देसाई, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी मनोगतातून आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अभय देसाई, माजी जि.प सदस्य जयकुमार मन्नोळी, महाबळेश्वर चौगुले, विकी कोणकेरी, लक्ष्मण तोडकर, मुन्नासो नाईकवडी, शिवाजीराव माने, ललिता भोसले, वैशाली नाईक, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष बसीर पठाण, इकबाल काझी, सुभाष देसाई, महादेव प्रसादे, अप्पासाहेब गडकरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध संस्था, कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार राजेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.





