मनसेने या समस्येकडे वेधले होते लक्ष
पालिका प्रशासनाकडून तातडीने दखल; मनसेने व्यक्त केले आभार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरालगतच्या ओढ्या- नाल्यांची साफसफाई करण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे. या संदर्भात आठ दिवसापूर्वी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी निवेदन देत प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. पालिकेने दखल घेत तातडीने मोहीम हाती घेतल्याने मनसेने समाधान व्यक्त केले आहे.
गडहिंग्लज शहराच्या सभोवती ओढ्यांची संख्या अधिक आहे. शहरात प्रवेश करताना सर्व ठिकाणी प्रामुख्याने ओढ्यावरून मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यापूर्वी या ओढ्यांची नियमित साफसफाई करणे गरजेचे होते. गेल्या वर्षी साफसफाई न झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी नागरी वस्तीत घुसून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ आली होती. याचबरोबर दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या ओढ्यांची साफसफाई करण्यात यावी. अशी मागणी मनसेने निवेदनातून पालिकेकडे केली होती. पालिका प्रशासनाने याची दखल घेत तातडीने ओढ्या- नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.



