Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

गडहिंग्लजच्या माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला अटक


संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी


न्यायालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी, घोषणाबाजी   





गडहिंग्लज (प्रतिनिधी): उद्योजक संतोष शिंदे, त्यांच्या पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांच्या आत्महत्या प्रकरणी गडहिंग्लजच्या 'त्या' माजी नगरसेविकेला व अमरावती येथे कार्यरत असणारे पोलीस अधिकारी राहुल राऊत (राहणार निलजी, तालुका गडहिंग्लज) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरा कर्नाटकातील विजापूर येथून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, या दोघांनाही सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.




याबाबतची अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख व युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या राहत्या घरी पत्नी मुलासह गळा चिरून घेत आत्महत्या केली होती. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. उद्योजक संतोष व त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या चौघांच्या नावाचा उल्लेख  केला होता.




'ती' माजी नगरसेविका व पोलीस अधिकारी राऊत यांनी बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडे एक कोटी खंडणीची मागणी केली, तसेच पुणे येथील विशाल बाणेकर व संकेत पाटे या दोघांनीही साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याने या तणावातून उद्योजक संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद गडहिंग्लज पोलिसात दाखल झाली होती. याप्रकरणी या चौघांवरही गुन्हा दाखल झाला होता. या संशयितांच्या  शोधासाठी पोलीस पथके नियुक्त करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, यातील माजी नगरसेविका व पोलीस अधिकारी राहुल राऊत या दोघांनाही  कर्नाटकातील विजापूर येथून पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, या दोघाही संशयितांना सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील पुणे येथील अन्य दोघा संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन सरगर करत आहेत.

 



न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी, घोषणाबाजी



दरम्यान, उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांना न्यायालयात आणल्याची माहिती मिळताच न्यायालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संशयितांचे वकीलपत्र घेण्यात येऊ नये यासाठी नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी  नागरिकांसोबत चर्चा करून समजूत काढल्यानंतर नागरिक शांत झाले. न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.