Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी व मुलाच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या माजी नगरसेविका व निलंबित पोलीस अधिकारी राहुल राऊत यांना न्यायालयाने आज (शनिवारी) न्यायालयीन कोठडी सुनावली.




गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख व युवा उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन या तिघांनीही २३ जून रोजी रात्री आत्महत्या केली होती. २४ जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. आत्महत्यापूर्वी उद्योजक संतोष व त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये गडहिंग्लजच्या 'त्या' माजी नगरसेविकेचे व तिचा साथीदार अमरावती येथे कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक राहुल राऊत या दोघांसह पुणे येथील विशाल बाणेकर व संकेत पाटे हे सर्वजण आपल्या आत्महत्येस  कारणीभूत असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी शुभम बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांनी या चौघांवरही गुन्हा दाखल केला होता. यातील माजी नगरसेविका  व सपोनी राऊत या दोघांनाही २६ जून रोजी पोलिसांनी विजापूर येथून अटक केली होती. या दोन्हीही संशयितांना न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. 


३० जून रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या दोघाही संशयितांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोन्हीही बाजूचा युक्तिवाद  ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली होती. याची मुदत शनिवारी संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्हीही बाजूचा व्यक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे ॲड. नीता चव्हाण यांनी बाजू मांडली. पोलीस निरीक्षक गजानन सरगर, उपनिरीक्षक विक्रम वडणे, उपनिरीक्षक शितल शिसाळ यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात संशयितांना न्यायालयात हजर केले.


  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.