हरळी खुर्द येथे आरोग्य शिबीरात केले मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, आहाराची वेळ, संतुलित आहार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असा सल्ला गडहिंग्लज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई यांनी दिला.
हरळी खुर्द येथील ग्रामपंचायत व सिद्धिविनायक तरुण मंडळ, हरळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबीरात डॉ. देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच साधना आयवाळे होत्या.
यावेळी बोलताना डॉ. देसाई म्हणाले, माणूस निसर्गाला शरण न जाता त्याला ओरबडायला निघाला आहे. चुलीवरचे जेवण जेवणे ही फॅशन तर फास्टफूड खाणे हे अन्न झाले आहे. त्यामुळे अलीकडे माणूस अनेक व्याधीने जखडला आहे. आरोग्य हीच माणसाची संपत्ती आहे. पण आपण आरोग्याबाबत जागरूक नसलो तर अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये गंभीर आजाराचा धोका वाढला आहे. यामध्ये पोट वाढणे, मधुमेह, रक्तदाब असे अनेक आजारांच्या समस्या उद्भवत आहेत. आपले शरीर व्याधीमुक्त व निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, आहाराची वेळ, संतुलित आहार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी दिला.
या शिबिरात हृदयरोग, मुत्ररोग व नेत्ररोग तपासणी व निदान करण्यात आले होते. यावेळी शंभरहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी मधुमेह तपासणी तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गौरव गुरव यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती दिली.
या शिबिरास कृष्णा पाटील, उपसरपंच चंद्रकांत राजे, वर्षा गुरव, सुषमा कुंभार, प्रदीप आयवाळे, तुकाराम देसाई उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सुधीर गुरव यांनी केले. आभार शशिकांत चौगुले यांनी मानले.


