Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पर्यावरणाचा समतोल ठेवणे काळाची गरज आहे : संदीप चोडणकर

गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात 'पाण्याचे संवर्धन' या विषयावर व्याख्यान संपन्न 


किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड कोल्हापूर यांचा सहभाग



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
पर्यावरण, पाणी हा महत्वाचा घटक आहे. पर्यावरणाचा समतोल ठेवणे काळाची गरज आहे. पर्यावरणाला हानी पोहोचू नये, याची सर्वांनी वेळीच काळजी घ्यावी. हवा, पाणी, प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि निखळ व निर्मळ जीवन जगण्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे असे मत पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर यांनी व्यक्त केले.


गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय व किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड कोल्हापूर यांच्या  वतीने आयोजित 'इको रेंजर्स' या उपक्रमांतर्गत 'पाण्याचे संवर्धन' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.



महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात किर्लोस्कर कंपनीचे सी.एस.आय.आर.प्रमुख शरद आजगेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. आकांक्षा कडूकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर पुढे म्हणाले, पाणी हे गरजेनुसार वापरून पुढच्या पिढीसाठी त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. आज पाण्याचे दुर्भीक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. पाण्याचा शाश्वत विकास कसा असावा, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे नियोजन हा देखील महत्वाचा विषय आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा विघटन करणे आवश्यक आहे. "ग्रीन जॉब" ही संकल्पना त्यांनी नव्याने मांडली. घरगुती कचरा विघटन प्रक्रियेत आपण सहभागी होऊन रोजगार निर्मिती कशा प्रकारे करू शकतो हे सर्वांना पटवून दिले. सद्या सर्व सजीवांवर पाणी तणाव किती प्रमाणात आहे हे सांगून पाण्याची होणारी नासाडी वेळीच थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले. पाण्याचे पुनर्वसन करून ठेवले पाहिजे शिवाय जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व त्यांनी सविस्तरपणे सांगितले. निसर्गासोबत सुसंगत राहिले पाहिजे. पाणी वाचविण्याची नैतिक जबाबदारी सर्वांनी पाळली पाहिजे.  तरच आपण पर्यावरणपूरक जीवन जगल्याचे खऱ्याअर्थी समाधान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी प्रा. गौरव पाटील, प्रा. मृणालिनी आसवले यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन वसुंधरा कमिटी प्रमुख प्रा. सुप्रिया मिसाळ यांनी केले. आभार प्रा. स्वाती शिंदे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.