Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आजरा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन



आजरा : संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.




या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी  दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन  केले होते. त्यावेळी आमदारांच्या  उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. दरम्यान, महामार्गाच्या अधिका-यांनी वरिष्ठांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप बैठक घेतली नाही. शिवाय खाजगी जमिनी संपादन करताना 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे रेडी रेकनरच्या पाचपट दराने दर निश्चित केल्याशिवाय कोणतेही महामार्गाचे काम करू नये अशी मागणी आहे. त्यामुळे महामार्गाचे चालू काम बंद करण्यात यावे. तसेच दि. 13 डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनावर महाराष्ट्रातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे व महसूल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर बैठकीमधून राज्य पातळीवर सर्व महामार्ग बाधित शेतक-यांच्यासाठी योग्य तो निर्णय होईलच. तोपर्यंत भूसंपादनाची मनमानी पैशाची नोटीस काढण्यात येऊ नये. योग्य दर न ठरवता काढलेल्या नोटिसा स्वीकारल्या जाणार नाहीत तसा ठराव बैठकीत करण्यात आला आहे.



आमदारांसोबत तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांतामध्ये काही मुद्दे आले नाहीत त्याची दुरुस्ती करून इतिवृत्त तयार करून देण्याचे ठरले असताना सुद्धा महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ते इतिवृत्त चर्चेतील सर्व मुद्यासह देण्यात यावे. शेतकऱ्यांची रस्ता बांधकामासाठीची सर्व माहिती संघटनेला देण्यात यावी, तसेच रस्ता बांधणाऱ्या कंपनीसोबत सरकारने केलेल्या कराराची प्रत संघटनेला देण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा बळजबरीने जमिनी घेऊन महामार्ग बनवला आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांच्या रस्ता रुंदीकरणासाठी वापरलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, सर्व लगतधारक शेतकऱ्यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यात यावे, जर अशा शेतकऱ्यांना  मोबदला दिला नाही तर बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वावर कंपनी यावेळी टोल वसुली करेल. त्यामध्ये मिळणाऱ्या पैशातील वाटेकरी हे संकेश्वर- बांदा महामार्ग लगतधारक शेतकरी राहतील. असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कॉम्रेड शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, संजय तर्डेकर, गणपती येसणे, आनंदा येसणे यांच्यासह महामार्गबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.