मुगळी (श्रीपाद स्वामी ): मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आयोध्याहून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे पूजन करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्यात श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर निमंत्रण म्हणून सदर अक्षता कलश मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याच्या अक्षता देशभरातुन घरोघरी देण्यात येत आहेत. त्यासाठीचे मंगल अक्षता कलश आयोध्यातून प्रत्येक गावागावात नेण्यात येत आहे.
मुगळी ग्रामस्थांच्या वतीने या मंगल अक्षता कलशाचे पूजन गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. बसवेश्वर मंदिराजवळ हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर टाळ मृदंगाचा गजर, ताशा, झांज पथक वाद्यांचा गजर, भजनी मंडळ व न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिधान केलेली विशेष वेशभूषा यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते. महिलांनी कलश व आरती घेऊन अक्षता कलशाचे स्वागत केले.
या अक्षता कलशाची बसवेश्वर मंदिर, ग्रामपंचायत, बस स्टॉप, ज्योतिर्लिंग मंदिर, सिद्धारूढ मठ, महालक्ष्मी मंदिर, पंत मंदिर, सोमलिंग मंदिर, हनुमान मंदिर आदी ठिकाणी मिरवणूक पार पडली. या शोभायात्रेत विद्यामंदिर न्यु इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, दत्त भजनी मंडळ, बाल अवधूत भजनी मंडळ, सिधारुढ भजनी मंडळ, यमुनाका महिला भजनी मंडळ, शिंदेवाडी महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते. "श्रीराम जय राम जय जय राम" "राम लक्ष्मण जानकी बोला जय हनुमान की" जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. हनुमान मंदिरामध्ये मंगल अक्षता कलश भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या कलश मिरवणुकीमध्ये सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व तरुण मंडळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





