Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानास गडहिंग्लज तालुक्यात सुरुवात

गडहिंग्लज तालुक्यातील सर्व 237 शाळांचा सहभाग

 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानास गडहिंग्लज तालुक्यात सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा प्रारंभ गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या अभियानात तालुक्यातील सर्व शाळांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळामधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यात येत आहे.


राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ भौतीक सुविधांचे निर्माण या घटकाअंतर्गत लहान व मोठी बांधकामे याच बाबीकडे लक्ष देण्यात आले आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन / प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास अशा अनेकविध घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक झाले आहे. या घटकांना योग्य त्याप्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वांगीण विकास साधता येतो. या घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान दि. १ जानेवारी  ते १५ फेब्रुवारी २०२४ (४५ दिवस) या कालावधीत राबविण्यात येत आहे. अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांचे १०० गुणापैकी मूल्यांकन करण्यात येणार आहे.


सदर अभियानाअंतर्गत तालुकास्तरावरील मुल्यांकनाचे कार्य प्राथमिकस्तर (केंद्र) व तालुकास्तर अशा दोन पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. संबधित गटविकास अधिकारी हे त्या तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या  शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी तालुकास्तर मुल्यांकन समिती अध्यक्ष राहणार आहेत.


प्रत्येक केंद्रातून स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून प्रत्येकी एक शाळा स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे. केंद्रस्तरावर निवड झालेल्या शाळांमधून तालुकास्तरावरील दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची शाळा निवडले जाणार आहेत. याच पद्धतीने जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या शाळा निवडणेत येतील.


निवड झालेल्या शाळांना आकर्षक बक्षिसे 


तालुकास्तर - प्रथम 3 लाख, द्वितीय 2 लाख, तृतीय 1 लाख रुपये


जिल्हास्तर - प्रथम 11 लाख, द्वितीय 5 लाख, तृतीय 3 लाख रुपये


विभागस्तर - प्रथम 21 लाख, द्वितीय 11 लाख, तृतीय 7 लाख रुपये


 राज्यस्तर- प्रथम 51 लाख, द्वितीय 21 लाख, तृतीय 11 लाख



गडहिंग्लज तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या एकूण २३७ शाळा असून १०० टक्के शाळांनी या अभियानात भाग घेऊन सुरुवात केली आहे. गडहिंग्लज तालुक्याचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी प्राथमिकस्तर व तालुकास्तर मुल्यांकन समिती गठीत केली आहे. या समितीत अध्यक्ष शरद मगर,  सदस्य मुख्याधिकारी स्वरूप खारगे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, सचिव विस्तार अधिकारी रमेश कोरवी यांचा समावेश आहे.



प्राथमिक स्तरावरील (केंद्रस्तर) मुल्यांकन समितीमध्ये केंद्रप्रमुख अध्यक्ष, केंद्रातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेचे शाळा मुख्याध्यापक सदस्य, खाजगी शाळामधील एक मुख्याध्यापक सदस्य अशी त्रिसदस्यीय मूल्यांकन समिती गठीत करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय बक्षिस पात्र होण्यासाठी सर्व शाळांनी शर्तीचे  प्रयत्न करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर  व गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.