गडहिंग्लजला पुरोगामी विचार संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
छायाचित्र : मज्जीद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सत्यशोधक हा मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चित्रपट मोफत दाखविण्यात यावा अशी मागणी गडहिंग्लज येथील पुरोगामी विचार संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनातून प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सुधारणा चळवळीचे क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निलेश जळमकर दिग्दर्शित आणि समता फिल्म व अभिता फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत सत्यशोधक हा मराठी चित्रपट अत्यंत प्रभावी व अप्रतिम आहे. यामध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनातील वास्तव प्रसंग उभारलेले आहेत. महापुरुषांचे महान कार्य हे सर्व समाजातील तरुण पिढीसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या विळख्यात सापडलेल्या नव्या पिढीला या महापुरुषांचा विसर पडत आहे. अशा स्थितीत हा ऐतिहासिक प्रेरणादायी चित्रपट सर्वांनी पाहणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री करावा तसेच शाळा व कॉलेजमधील मुला मुलींना हा चित्रपट मोफत दाखवण्याची व्यवस्था करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रा.आशपाक मकानदार, सिद्धार्थ बन्ने, प्रा. सुभाष कोरे, प्रकाश कांबळे, प्रा. विजय काळे, महावीर दसुरकर, प्रा. एन. बी. गावडे, प्रा. पुंडलिक रक्ताडे, प्रा. पी.डी.पाटील, प्रा. योगेश पाटील, बाबुराव आयवाळे यांच्या सह्या आहेत.



