कृषी, औद्योगिक व गृहपयोगी वस्तूंसह बऱ्याच वस्तू एकाच छताखाली
प्रदर्शनात एक टन वजनाचा रेडा ठरतोय सर्वांचे आकर्षण
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कृषी, औद्योगिक व गृहपयोगी वस्तूंसह बऱ्याच वस्तू एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी राज डावरे यांनी गडहिंग्लज येथे आयोजित केलेल्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. या प्रदर्शनात चंदगड तालुक्यातील हंबेरे येथील प्रभाकर पाटील यांचा एक टन वजनाचा व तीन वर्ष वयाचा रेडा आकर्षणाचा विषय ठरला आहे. सदर कृषी प्रदर्शन हे चार दिवस चालणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन ठाकरे गट शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजक राज डावरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
सदर कृषी प्रदर्शन हे संजीवनी महिला कृषी विकास व बहुउद्देशीय संस्था, किसान ॲग्रीकल्चरल अँड इंडस्ट्रियल एक्झिबीशन सोसायटी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, गडहिंग्लज नगरपालिका आणि राज इव्हेंट, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एस. टी. स्टॅण्ड मागे, गर्ल्स हायस्कूल जवळील खुल्या मैदानावर सुरू झाले आहे. प्रदर्शन 6 ते 9 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शन सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये सर्वांना प्रवेश विनामुल्य आहे.
या प्रदर्शनात ट्रॅक्टर, शेतीसाठी लागणारी अवजारे, बि-बियाणे, खते, व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पध्दती, टिश्युकल्चर, कृषी व्यवस्थापक, शेती अर्थ पुरवठा, बैंकिंग इन्शुरन्स, मार्केटिंग व्यवस्थापन, रोपवाटिका (नर्सरी), पाणी व्यवस्थापन, शासकीय व विना शासकीय संस्था संघटना व शासकीय एजन्सीज, दुग्ध व्यवसाय, अपारंपारिक ऊर्जा, मत्स्योत्पादन, रेशीम उदयोग याच बरोबर अन्न प्रकिया व साठवणूक, पॅकेजिंग पध्दती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, गडहिंग्लज तालुका कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी अंतर्गत कृषी महाविदयालय कोल्हापूर आदी विषयी प्रात्यक्षीक व माहिती मिळू शकेल. या प्रदर्शनात शेतीत नव नवीन प्रयोग करणाऱ्या शेतक-यांसाठी शेतमालाची (ऊस, केळी, फुले, फळे) पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या प्रदर्शनाची "गडहिंग्लज बुलेटिन" ने व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली एक झलक पहा.....👇






