गडहिंग्लजच्या जागृती प्रशालेत क्रीडा महोत्सवाचे उदघाटन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्याच्या पिढीला मैदानी व सांघिक खेळाची नितांत गरज आहे. मोबाईल, इंटरनेट, टीव्हीच्या युगात विद्यार्थी खेळ विसरले आहेत. त्यामुळे नाजूक शरीराची निर्मिती होत आहे. पैशापेक्षा शरीर संपदा महत्त्वाची असून सदृढ शरीरासाठी विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळले पाहिजे. असे प्रतिपादन अस्थिरोग तज्ञ डॉ. रणजीत कदम यांनी केले.
गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी केले. क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. रणजित कदम, डॉ. श्रीकांत सुतार, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, गजेंद्र बंदी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन व कबूतर आकाशात सोडून वार्षिक क्रीडा महोत्सवाची जल्लोषी सुरुवात करण्यात आली. कु. भूमिका कुरळे हिने खेळाडूंना शपथ दिली.
यावेळी डॉ. श्रीकांत सुतार म्हणाले, शालेय जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळ खेळला पाहिजे. हार- जीत याची तमा न बाळगता सचोटीतून मिळणारे यश आनंददायी असते. डॉ. गजेंद्र बंदी यांनी सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्वपूर्ण असल्याने सर्वांनी खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, बुद्धिबळ, कॅरम, कुस्ती व बॅडमिंटन खेळांना सुरुवात झाली. या कार्यक्रमास डॉ. शिवानंद मस्ती, प्रा. अनिता चौगुले, शिवाजी अनावरे, शुभम साळवेकर, कुमार क्षितिजा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले. आभार बाळासाहेब खरात यांनी मानले.





