Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शंभर वर्षांवरील मतदारांचा विशेष मान-सन्मान होणार

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची अधिकाऱ्यांना सूचना


भडगाव येथील मतदान केंद्रांना भेट देत घेतली माहिती


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा 


भडगाव : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना माहिती देताना तहसीलदार ऋषिकेत शेळके. यावेळी उपस्थित प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील मतदान केंद्रांच्या तयारीची पाहणी करून माहिती घेतली. दरम्यान, 80 वर्षावरील त्याबरोबरच विशेष बाब म्हणून 100 वर्षावरील मतदारांच्या नावांची यादी काढण्यात यावी. याबाबत विशेष मोहीम राबवावी. या मतदारांचा विशेष मानसन्मान करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.




सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  केंद्रशाळा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. येथील सहा मतदान केंद्रावर प्रत्यक्ष हजर राहुन सर्व बीएलओ अधिकारी यांच्याशी संपर्क साधत त्याच्याकडुन माहिती जाणून घेतली. त्यांना मार्गदर्शन करत काही सुचना देखील त्यांनी केल्या. शाळेचा संपुर्ण शाळा परिसर पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. तलाठी रूपाली कांबळे यांच्याकडून 80 वर्षांवरील मतदारांसंदर्भात त्यांनी माहिती घेतली.




यावेळी तलाठी रूपाली कांबळे यांनी गावात शंभर वर्षावरील एक महिला मतदार असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कोणती व्यवस्था करणार आहात? असा प्रश्न केला.




सदर मतदार हे मतदान केंद्रापर्यंत येऊ शकतात असे तलाठी यांनी सांगितले. 100 वर्षांवरील मतदार ही विशेष बाब आहे. अशा मतदारां संदर्भात एक विशेष मोहीम  राबविण्यात यावी. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर त्यांचा विशेष मान-सन्मान करण्यात यावा असे जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना सांगितले.




यावेळी भडगाव गावातील काही समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. भडगाव गावचा विस्तार पाहता स्मशानभुमीसाठी गायरानमधील जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात  पाठपुरावा केल्यास हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी सांगितले.




यावेळी  प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसिलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक गजानन सरगर, पोलिस पाटील उदय पुजारी, तलाठी रूपाली कांबळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गवळी, रवी शेंडुरे, उपसरपंच रविशंकर बंदी, ग्रामपंचायत सदस्य दीपक कोरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय्यद मुल्ला, प्रभारी मुख्याध्यापक अण्णासाहेब गजबर यांच्यासह अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.