Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढली तरच ग्रंथालय चळवळ टिकेल!

पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले यांचे मत


गडहिंग्लजला जिल्हा ग्रंथोत्सवानिमित्त कार्यक्रम संपन्न 



                                  छायाचित्र : मज्जीद किल्लेदार, गडहिंग्लज 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): मोबाईलच्या  जगात असणाऱ्या सध्याच्या युवा पिढीला वाचन संस्कृतीचे महत्व सांगण्याची गरज आहे. त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढल्यास ग्रंथालय चळवळ टिकेल असे मत पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले यांनी व्यक्त केले.




गडहिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रारंभी दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत अत्याळ येथील भजनी मंडळ, बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, शिवराज महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रंथालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. यावेळी त्यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रामीण भागात विविध उपक्रम राविण्यात येत असल्याचे सांगितले.




यावेळी बोलताना सहाय्यक ग्रंथालय संचालिका इंगोले पुढे म्हणाल्या, शासनाकडून ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. आजच्या युवा पिढीला ग्रंथांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. या माध्यमातून ज्ञान व विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. मोबाईलमुळे वाचन संस्कृती थांबते की काय अशी भीती निर्माण होत आहे. त्यामुळे युवा पिढीला ग्रंथांचे महत्त्व पटवून देऊन वाचन संस्कृती किती महत्त्वाची आहे ही सांगण्याची गरज आहे. वाचन संस्कृती बाहेर गेलेल्या प्रवाहाला पुन्हा प्रवाहात आणावे लागेल. असे झाल्यास वाचन संस्कृती टिकण्यास मदत होईल. यावेळी प्रा. किसनराव कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.



 

या कार्यक्रमास नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक ओंकार बजागे, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. सुशांत मगदूम, संचालक प्रकाश इंगळे,  शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, सानेगुरुजी वाचनालयाचे ग्रंथपाल राजेंद्र भुईबर यांच्यासह जिल्ह्यातील ग्रंथपाल, वाचक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा पाटील, गौरव पाटील यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष दत्ता देशपांडे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.