मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना बुधवारी मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होणार आहे. दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. शिक्षणासाठी मनोहर जोशी मुंबईत आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी पदावर सेवा बजावली. १४ मे १९६४ रोजी अनघा जोशी यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना मुलगा उन्मेष, अस्मिता आणि नम्रता या दोन मुली आहेत. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत मनोहर जोशी यांनी काम केले. ते कट्टर शिवसैनिक होते. या कालावधी त्यांनी मुंबई महापालिका नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सदस्य अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

