शिक्षक विठ्ठल पाटील यांच्याकडून कन्येच्या वाढदिवसानिमित्त भेट
गेल्या बारा वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे उपक्रम
हत्तरगी : दड्डी येथील श्रीमती सुंदराबाई भांदूर्गे हायस्कूल मधील शिक्षक विठ्ठल पाटील यांनी आपली कन्या कु. मानसी पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त हायस्कूलमध्ये मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण व्हावी, अवांतर वाचनातून सामान्यज्ञान, मनोरंजक माहिती, आणि महापुरुषांची चरित्रे यांचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे या हेतूने प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप केले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक एम. सी.पाटील म्हणाले, शिक्षक विठ्ठल पाटील यांचा हा उपक्रम गेली बारा वर्षे सुरु आहे. या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली आहे. खरोखरच हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. याप्रसंगी श्रीमती जे. एन.पाटील, व्ही.एस. पाटील, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते,


