तेरणीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर मलकानावर यांनी वेधले लक्ष
एसटी बस नसल्याने नागरिकांना करावी लागते पायपीट
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी - हत्तरगी मार्गावर एस.टी बस सुरु करण्याची मागणी तेरणीचे माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर मलकानावर यांनी केली आहे. 'जीबी न्यूज'शी बोलताना त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी, हलकर्णी, बुगडीकट्टी, नरेवाडी, मनवाड या गावातील नागरिकांची दररोज कर्नाटकातील यमकनमर्डी, हुक्केरी, बेळगांव, गोकाक या गावांशी संपर्क असतो. सध्या तेरणी-मनवाड-नरेवाडी या मार्गाचे देखील डांबरीकरण झाल्याने नागरिकांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध कामाच्या निमित्ताने हत्तरगी मार्गे बेळगावसह इतर ठिकाणी नागरिक दररोज ये-जा करत असतात. परंतु हत्तरगी मार्गावर तेरणीपासून ये-जा करण्यासाठी एखादीही बस नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. नागरिकांना रोज हत्तरगीपर्यंत पायी प्रवास करावा लागतो. हा जवळचा मार्ग असून देखील पायपीट करावे लागत असल्याने हलकर्णी मार्गे खानापूर गेटवरून हत्तरगी गाठावे लागते. किंवा तेरणीतून एखाद्या दुचाकीस्वराला हात करून जावे लागते. बसची सोय नसल्याने खानापूर गेट मार्गे जाणे म्हणजे नागरिकांना "वाईमार्गे सातारा" या म्हणीप्रमाणे प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ, पैसा देखील खर्ची पडतो. बेळगांव हे या भागातील मुख्य बाजारपेठ आहे. या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल या बाजारपेठेत जात असतो. बस वाहतुकीची सोय नसल्याने शेतकऱ्यांनाही मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
गडहिंग्लज - नरेवाडी- हलकर्णी- तेरणी या मार्गावर एस्. टी बस सोडावी अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. परंतू या मार्गावर अद्याप बस सुरु न केल्यामुळे नागरीक व प्रवाशांमधून नाराजी दिसत आहे. या मार्गावर बस सुरु करून प्रवासी व शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी श्री. मलकाणावर यांनी केली आहे.

