१९९५-९६ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
दड्डी : दड्डी पंचक्रोशीतील मोदगे गावातील प्राथमिक व माध्यमीक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा (गेट टुगेदर) उत्साहात पार पडला. सन१९९५-९६ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २७ वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी.जे.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक एस. आर. पाटील, एन. बी. परमाज, ए.एम.आंबे वाडकर, ए.पी दळवी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी शाळा कालावधीतील जुन्या आठवणी आपले मनोगतातून व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना देखील आणले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांचा देखील सत्कार करून गुरुवंदना करण्यात आली. यावेळी अरुण खवणेकर, सदानंद खवणेकर, सागर कोकीतकर, वृषाली बागडी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला 'एक्वा फिल्टर' भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली कोकितकर व दयानंद दळवी यांनी केले. आभार सदानंद खवणेकर यांनी मानले.


