आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन
'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानात यश मिळवलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील शाळांचा करण्यात आला गौरव
हरळी बुद्रुक येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा
![]() |
| हरळी बुद्रुक : 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानातील पुरस्कार प्राप्त शाळांचा गौरव करताना आमदार राजेश पाटील. यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानामुळे राज्यातील शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. शासनाने यासाठी 66 कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. या उपक्रमाची नोंद गिनीज बुकने देखील घेतली असून शिक्षण विभागाचे हे अभियान खरोखरच कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. या अभियानाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शाळांना प्रोत्साहन मिळत आहे, दुर्गम भागातील शाळांचा देखील गौरव होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या पुढाकाराने गावोगावी शैक्षणिक उठाव होत आहेत, असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील सिंबायोसिस स्कूल येथे 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कोऱ्या पाट्या राहू नयेत याची काळजी शिक्षकांनी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये किमान 35 गुण मिळवण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील अवघड विषयांची भीती दूर करून त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हरळीतील सिंबायोसिस ही शाळा आणि सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. असे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या कामाबद्दल आमदार राजेश पाटील यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे विशेष कौतुक केले.
गटविकास अधिकारी शरद मगर म्हणाले, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे तालुका स्तरावरील मूल्यमापन अत्यंत पारदर्शकपणे झाले आहे. निपक्षपातीपणे गुणांकन करण्यात आले आहे. अभियानातील निकषास पात्र ठरणाऱ्या शाळांनाच पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ज्या शाळांना या स्पर्धेत यश मिळाले नाही त्यांनी पुढच्या वर्षी तयारी करावी. या उपक्रमाच्या निमित्ताने शाळांना प्रोत्साहन मिळत असून याद्वारे खेड्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांना संघर्ष करण्याची जिद्द आणि चिकाटी असते पण त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी अपडेट होणे आवश्यक आहे. शिक्षकी पेशा हा पवित्र आणि उत्तम आहे. चांगला विद्यार्थी व उत्तम नागरिक शिक्षकच घडवू शकतात. त्यामुळे देशाचे उज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांच्या हाती असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सिंबायोसिस स्कूल हरळीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे राज्य गीत सादर केले. स्वागत व प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अभियानाचा संपूर्ण आढावा घेतला. या अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेचे अत्यंत काटेकोरपणे मूल्यमापन केले असून या अभियानात तालुक्यातील 234 शाळांनी सहभाग घेतला होता. केंद्र स्तरावर 98 शाळांची निवड झाली. तालुकास्तरावर सहा शाळांची तर जिल्हास्तरावर एका शाळेची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोषण आहार अधीक्षक विमल चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कासार, सिंबायोसिस शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला, केंद्रप्रमुख अनिल बागडी, विकास पाटील, विजय कोळी, आनंदा आजगेकर, बाळासो शेरेकर, सुषमा लोखंडे, दिलीप शिंगटे, संदीप बाबर, प्रकाश पन्हाळकर, यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चंद्रकांत जोशी, अरुण देशपांडे, कविता कागिणकर, राजेंद्र शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप परीट यांनी मानले. सूत्रसंचालन मारुती कोलूणकर व गीता मोरे यांनी केले.
पुरस्कार प्राप्त शाळा पुढील प्रमाणे -
शासकीय शाळा-
तालुकास्तर: अनुक्रमे एम आर हायस्कूल गडहिंग्लज, विद्या मंदिर ऐनापुर , विद्या मंदिर नांगनुर,
केंद्रस्तर- अनुक्रमे विद्या मंदिर लिंगनूर क.नूल, केंद्र शाळा भडगाव, विद्यामंदिर बुगडीकट्टी, विद्यामंदिर सरोळी, विद्यामंदिर यमेहट्टी, विद्यामंदिर इदरगुची, विद्यामंदिर मासेवाडी, विद्यामंदिर कन्या शाळा हेब्बाळ.
खासगी शाळा-
तालुकास्तर- अनुक्रमे एस एस हायस्कूल नेसरी , न्यू इंग्लिश स्कूल नुल, न्यू इंग्लिश स्कूल कौलगे.
केंद्रस्तर-अनुक्रमे जागृती हायस्कूल गडहिंग्लज, रवळनाथ विद्यामंदिर कुमरी, हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द, महात्मा फुले विद्यालय महागाव, हिडदुगी हायस्कूल हिडदुगी, क्रिएटिव्ह स्कूल बड्याचीवाडी, न्यू होरायझन स्कूल औरनाळ, हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी, एस.डी. हायस्कूल मुत्नाळ.



