२१ मार्च जागतिक वन दिनानिमित्त आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सामाजिक वनीकरण विभागामार्फत महागावच्या महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील राष्ट्रीय हरित सेना विद्यार्थ्यांसाठी २१ मार्च जागतिक वन दिनानिमित्त दाजीपूर अभयारण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लज यांच्या पुढाकारातून नियोजन केले होते.यावेळी विद्यार्थ्यांना दाजीपूर अभयारण्यातील वृक्षांचे प्रकार,विविध प्राण्यांचे विषयी माहिती देण्यात आली.पहिल्यांदाच अभयारण्यात गेलेली विद्यार्थीना जंगल पाहून भारावून गेले होते.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने २१ मार्च जागतिक वन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय क्षेत्रभेट या उपक्रमाचे आयोजन केले होते.अभयारण्यात पोचल्यानंतर विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कागलच्या वनक्षेत्रपाल सोनल केसरकर यांनी जंगलाचे प्रकार,जंगल संवर्धनासाठी विभागाकडून केले जाणारे वेगळे उपाय,झाडांच्या विविध जाती व त्यांचे औषधी गुणधर्म,जंगलातील विविध प्राणी,गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य,याच अभयारण्यात गोव्यासाठी लागणारी करवी वनस्पती,झाडांपेक्षा गवत वाढवण्यासाठी केले जाणारे विविध प्रयोग,प्राण्यांची जनगणना,पावसाच्या अगोदर पाणवठे स्वच्छ करणे,पायाच्या ठशावरून प्राणी ओळखणे याविषयी माहिती सांगितली. यावेळी पर्यवेक्षक मोहन कांबळे, सर्व तालुक्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यासाठी गडहिंग्लज सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल राजेंद्र चौगुले, वनपाल एस.एस.पाटील, रुपाली पाटील, रुबीना सोलापुरे अदीने नियोजन केले.
विद्यार्थ्यांना वनांची व प्राण्यांची माहिती व्हावी हा उद्देश!
२१ मार्च जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर प्रत्यक्ष जंगल सफारी, प्राण्यांची माहिती, जंगलातील विविध झाडे, झाडांचे औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. भविष्यात या विद्यार्थ्यांना वनांची व प्राण्यांची माहिती व्हावी हा उद्देश आहे.
-एस. एस. पाटील
वनपाल सामाजिक वनीकरण परीक्षेत्र, गडहिंग्लज




