गडहिंग्लजला ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा, मार्कंडेय, चित्री या नद्यांचे उन्हाळ्यात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) वतीने गडहिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, मुरगुड, भुदरगड, नगरपालिका व नगरपरिषद हद्दीत दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा, मार्कंडेय, चित्री या नद्यांच्या उगमाकडील सुरुवातीचा प्रदेश आहे. या परिसरात उत्तम पर्जन्यमान असून धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा आहे. तरीही उन्हाळ्यामध्ये या सर्व नद्या प्रदूषित होतात. नागरी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. नागरी घनकचरा डिसेंबर २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार प्रक्रिया व विल्हेवाट केली जात नाही. परिणामी सदर कचरा थेट नदी नाल्यात मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे. नगरपालिका व नगरपरिषद हद्दीत असणारे सर्व वैद्यकीय घनकचरा व द्रवकचरा प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाची स्वतंत्र प्रक्रिया प्रकल्प असणे आवश्यक आहे, मात्र ते उभारले जात नाही.
सर्व हॉटेल, उद्योग, हॉस्पिटल, मंगल कार्यालये, यात्री निवास, फेरीवाले, सर्व्हिसिंग सेंटर, केटरिंग व्यावसायिक यांच्याकडून होणाऱ्या घन व द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सदर व्यवसायिकांची असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नाही परिणामी सर्व प्रकारच्या प्रदूषणात भर पडत आहे. प्रतिवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. सदर कामात पूरक असणाऱ्या जैवविविधता संवर्धन समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, सिटी लेव्हल मॉनिटरिंग कमिटी यांची निर्मिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. या सर्व नद्यांचे पाणी कायम प्रवाहित राहण्यासाठी, पूर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पार्श्वभूमीवर जमीन, शेती, नदी, पाणी, हवा प्रदूषण रोखण्यासाठी योगिता उपाययोजना करण्यात याव्यात. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, महिला जिल्हा संघटक सौ. शांता जाधव, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, शहर प्रमुख संतोष चिकोडे आदींसह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

