Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या सखी महिला मंडळाने कोल्हापूरच्या मातोश्री वृद्धाश्रमाशी जपले आपलेपणाचे ऋणानुबंध



गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपलेपणाची ओढ ही माणुसकीला जपणारी असते. समाजातल्या असाहय माणसांना माणुसकीची उब देता यावी. ज्यांनी कष्टातून संसार उभा केला. संपूर्ण कुटुंबाला आधाराची सावली दिली. त्याच जाणत्या वयोवृ‌द्धांच्या जगण्याचे आभाळ होऊ नये. त्यांच्या डोळ्यातल्या आसवांना वृ‌द्धाश्रमात मिळणारा न्याय हा आजच्या या आधुनिकतेत आपलेपणाचा आधार आहे. या आधाराला आणखी थोडी मदत व्हावी ही समाज मनाची तळमळ खूप काही सांगणारी आहे. याच वृ‌द्धाश्रमाला काहीतरी मदत करावी आणि समाजशीलता जपावी या उदात हेतूने गडहिंग्लजच्या सखी महिला मंडळाने कोल्हापूर येथील मातोश्री वृ‌द्धाश्रमाला गरजेच्या भेटवस्तू देऊन जपलेला स्नेह हा माणुसकीचे ऋणानुबंध घट्ट करणारा आहे. मातोश्रीतील वृ‌द्धांना भेटवस्तू देऊन संस्थेच्या पदाधिकारी व वृद्धांशी संवाद साधला.



यावेळी सखी महिला मंडळाच्या उज्वलाताई दळवी, उर्मिला कदम यांनी मार्गदर्शन केले. माणुसकीच्या आधाराला जागविणारा हा उपक्रम आजच्या जमान्यात माणसा-माणसांशी असणारे नाते दृढ करणारा आहे. 'हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ही प्रार्थना मातोश्री वृ‌द्धाश्रमात गाण्यात आली. यामुळे अजूनही माणुसकी जीवंत आहे. याची प्रचिती आली.





या दातृत्वामध्ये कॉम्रेड उज्वलाताई दळवी, सुमन सावंत, उर्मिला कदम, छाया बडगावे, माया पाटील, गीता पालकर, सविता चव्हाण, अरुणा शिंदे, शारदा अजळकर, सौ. जगताप, गीता पाटील, सौ. फराकटे, सुवर्णलता गोविलकर, सौ. वाघ, सौ. बुगडे, सौ. मोहिते, सौ. शेख यांनी सदरच्या गरजू भेटवस्तू वृद्धाश्रमाला प्रदान केल्या. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या संस्था पदाधिकारी यांनी या उपक्रमाबाबत आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.