क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक एस.बी.सावंत यांचा सल्ला
महागावच्या महात्मा फुले विद्यालयात जागतिक क्षयरोग सप्ताह निमित्त मार्गदर्शन

महागाव : येथे बोलताना एस. बी. सावंत. सोबत पर्यवेक्षक मोहन कांबळे, सोनल जाधव, व्ही.एम.पाटील यांच्यासह इतर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. फुफ्फुस व अन्य शरीराच्या भागावर हा आजार होऊ शकतो. हा आजार झालेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष केल्यास संसर्गामुळे नवीन दहा रुग्ण तयार होतात. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी वेळीच शासकीय दवाखान्यात तपासण्या करून उपचार घेतल्यास आजार बरा होऊ शकतो असा सल्ला कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयाचे (सीपीआर) वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक एस. बी. सावंत यांनी व्यक्त केले.
महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक क्षयरोग दिन सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मोहन कांबळे होते. यावेळी सोनल जाधव, आरोग्य सहाय्यक व्ही. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सावंत पुढे म्हणाले, जगाच्या लोकसंख्येपैकी २७ टक्के क्षय रुग्ण भारतात आहेत. क्षयरोग रुग्णांना शासनाकडून सहा महिने पूरक आहारासाठी प्रतिमहिना पाचशे रुपये रुग्णांच्या खात्यावर जमा होतात. यासाठी दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत तपासण्या व उपचार घ्यावेत असे आवाहन केले.
या क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार रमेश कळविकट्टे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

