गडहिंग्लज तालुक्यात असाक्षरांनी दिली परीक्षा!
२५ केंद्रांवर २२८ असाक्षरांची उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील विविध २५ केंद्रांवर २२८ असाक्षरांनी परीक्षा देत साक्षर बनले. गडहिंग्लज तालुक्यात गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या परीक्षेचा अनुभव घेताना असाक्षर परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर आपण साक्षर झाल्याचा एक वेगळाच आनंद दिसून आला.
![]() |
| कडलगे : गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन असाक्षर परीक्षार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. |
केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यात असाक्षरांनी देखील ही परीक्षा दिली. रविवार दिनांक १७ मार्च रोजी तालुक्यातील २५ परीक्षा केंद्रावर २३२ पैकी २२८ असाक्षर व्यक्तींनी उपस्थित राहत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षा दिली. केवळ चार जण गैरहजर राहिले होते.
देशभरातील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत असाक्षर लोकांना शिक्षण देण्यासाठी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना साक्षर बनविण्याचे उत्कृष्ट काम केले. या पार्श्वभूमीवर या असाक्षरांची परीक्षा पार पडली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा जेष्ठ शिक्षक यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. तसेच शाळेतील शिक्षकांची पर्यवेक्षक, परीक्षक, लिपिक, शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर असाक्षर व्यक्तींची रोपे, फुले देऊन स्वागत करण्यात आले.
परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत त्यांच्या सोयीनुसार दोन तासाची दीडशे गुणांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा दरम्यान तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांना उपशिक्षणाधिकरी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विषय तज्ज्ञ शिक्षक यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. सर्वच परीक्षा केंद्रावर असाक्षर व्यक्तींचा परीक्षेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तालुक्यामध्ये परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तालुका समन्वयक गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप परीट, बी.एम.कासार, विशेष साधन व्यक्ती दयानंद कोरवी, इक्बाल जमादार आदीने कामकाज पाहिले. त्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे , माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
गडहिंग्लज तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. असाक्षर असलेल्यांना साक्षर करण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली होती. गडहिंग्लज तालुक्यात नोंदणी केलेल्या २३२ पैकी २२८ असाक्षरांनी उपस्थित राहत परीक्षा दिली. तालुक्यातील पंचवीस केंद्रांवर उत्स्फूर्तपणे ही परीक्षा पार पडली.
-नवलकुमार हालबागोळ
गटशिक्षणाधिकारी




