Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तब्बल 48 वर्षानंतर अभिनव सेकंडरी हायस्कूलचे माजी विद्यार्थी जमले एकत्र

मोदगे येथे 1975- 76 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा पार पडला स्नेहमेळावा 


शिक्षकांचा देखील करण्यात आला सत्कार 





दड्डी : बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण (BJSS) समिती संचलित श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूल (तालुका हुक्केरी) येथे सन 1975- 76 या कालावधीमध्ये एस.एस.एल.सी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा 48 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्नेहमेळावा श्री भावेश्वरी मंगल कार्यालय मोदगे येथे पार पडला. या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.



त्यावेळी माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता दड्डी या ठिकाणी अभिनव सेकंडरी हायस्कूल (आताचे सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूल) हे एकमेव होते. हायस्कूलमध्ये येण्याकरिता आजूबाजूच्या खेड्यांमधील म्हणजे दड्डी, मोदगे, सलामवाडी, शट्टीहळी, खवणेवाडी, कोट, मणगुत्ती या ठिकाणाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे दळणवळणाचे साधन नव्हते. त्यामुळे उन्हा- पावसामध्ये पाच ते सहा किलोमीटरचा दररोजचा पायी प्रवास करून माध्यमिक शिक्षण घेतलेले आहे. सदरच्या ठिकाणी शिक्षण घेऊन  काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे व आर्थिक परिस्थितीनुसार उच्च शिक्षण सुद्धा घेतलेले आहे. काहींनी महाराष्ट्र राज्यात शासकीय सेवा करून त्या ठिकाणी आपला चांगला ठसा उमटवलेला आहे. 



माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला  होता. सदर मेळाव्याकरिता हायस्कूलमध्ये सन 1975- 76 साली मराठी माध्यमातून  शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोदगे, दड्डी, सलामवाडी, शट्टीहळी, खवणेवाडी, कोट व मणगुती या गावांमधील होते. तसेच नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, बेंगलोर, सोलापूर या ठिकाणी असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा या स्नेहमेळाव्या करिता उपस्थित होते. 



या स्नेहमेळाव्यासाठी अभिनव सेकंडरी हायस्कूल दड्डी या ठिकाणी शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडलेले व सध्या सेवानिवृत्त असलेले आर. आर. गडकरी, एम. बी. सालगुडे उपस्थित होते. त्यानी  स्नेहमेळाव्यात मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्नेह मेळाव्याचे प्रमुख अतिथी आर. आर. गडकरी व एम.बी. सालगुडे यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने  सत्कार करण्यात आला.




मेळाव्यामध्ये आर. आर.गडकरी, एम. बी. सालगुडे यांच्या हस्ते उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.