गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील सुमित्रा प्रतिष्ठान संचलित एकाग्रता अभ्यासिका व करिअर गाइडन्स सेंटर येथे अभ्यासिकेतील विविध स्पर्धा परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर, एलआयसीचे विकास अधिकारी प्रेमकुमार नाईक तर अध्यक्षस्थानी पुणे येथील आयकर आयुक्त मलिकार्जुन उत्तुरे उपस्थित होते.
यावेळी एकाच वर्षी सलग तीन 'एमपीएससी' च्या परीक्षा उत्तीर्ण करून राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, राज्य विक्रीकर निरीक्षक आणि राज्य सहायक विक्रीकर आयुक्त (वर्ग १ ) पदी निवड झालेली अभ्यासिकेची विद्यार्थिनी अक्षता महादेव कुपटे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झालेला मुझफ्फर राजगफुर बागवान या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. श्री. चिंचकर यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी अधिकारी होऊन शासकीय सेवेत दाखल व्हावे यासाठी ही अभ्यासिका सुरु केली आहे. कोणताही कोचिंग क्लास न लावता, गावात राहून अगदी श्रेणी ३ ते श्रेणी 1 पर्यंत मजल केवळ एकाग्रता अभ्यासिका व येथील मार्गदर्शनामुळेच शक्य झाले असे अक्षता कुपटे हिने आपल्या मनोगतात सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की पुणे गाठावे लागते असे म्हणतात पण आपल्याच गावात मोफत मार्गदर्शन, अभ्यासिका, अद्ययावत पुस्तके, एकाग्रता अभ्यासिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देते. याचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन मुझफ्फर बागवान यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शितल गोंधळी तर सूत्रसंचालन कु. नम्रता खानापुरे हिने केले. दीपक सोमशेट्टी यांनी आभार मानले.

