Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड, सामानगड मार्गावरील बसफेऱ्या वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय

सामानगड घाटात गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले 


शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप 


आगाराचे वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष : सरपंच शुक्राचार्य चोथे 






गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नौकुड, सामानगड मार्गावर वेळेत बसफेऱ्या सोडल्या जात नसल्याने प्रवाशांसह ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढल्याने याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी या समस्येकडे गडहिंग्लज आगाराचे वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी कोणाच्या दरबारी जावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.




गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी भागामध्ये  खास करून नौकुड भागातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी असणारे बस वेळेवर येत नाहीत.सध्या शाळेच्या मुलांच्या परिक्षेचे दिवस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळच जाणे गरजेचे असते. मात्र बस वेळेत येत नाहीत. त्यामुळे मुलांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. काही वेळेला बस फेरी अचानक रद्द करण्यात येते. तसेच आधेमध्ये  सामानगड घाटात बस बंद पडतात. त्यामुळे तासंतास दुसऱ्या बसची प्रतीक्षा करत शाळेच्या मुलांसह प्रवाशांना बसावे लागते. त्यामुळे मुलांना त्रास होत आहे. गाड्यांच्या समस्येमुळे मुलांना परीक्षेला सोडायला आणायला पालकांना शाळेपर्यंत जावे  लागत आहे. त्यामुळे पालकांना सुध्दा कामाच्या  दिवसात अडचण होत आहे.



गडहिंग्लज- सामानगड-नौकुड- हलकर्णी या मार्गावर सुस्थितीत असलेल्या बसेस सोडण्यात यावीत जेणेकरून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची  होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. गडहिंग्लज आगाराने बस फेऱ्या वेळेत  व सुस्थितीतील गाड्या या मार्गावर सोडाव्यात अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवासी वर्गातून होत आहे.



आगाराचे वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष : सरपंच शुक्राचार्य चोथे


नौकुड, सामानगड मार्गावरील बस फेऱ्यांबाबत गडहिंग्लज आगाराचे वारंवार निवेदनाद्वारे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केले जात आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कोणाच्या दरबारी जावे लागणार? असा प्रश्न पडल्याचे  नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी सांगितले. या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वेळेत येत नाहीत. परिणामी बऱ्याचदा  सामानगड घाटात गाड्या बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना तासंतास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे या मार्गावर गाड्या वेळेत सोडाव्यात. सुस्थितीतील गाड्या सोडून प्रवाशांना होणारा मनस्ताप टाळावा. अशी मागणी सरपंच श्री. चोथे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.