Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

युवा सैनिकांनी नव मतदारांवर लक्ष केंद्रित करावे!

युवा सेनेचे जिल्हा विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांचे आवाहन


श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती विजय होणार यात तिळमात्र शंका नाही. त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नव मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन ठाकरे पक्ष युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांनी केले. 



कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथील शिवसेनेच्या जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी डॉ. नरसिंग बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे उपस्थित होते.



यावेळी बोलताना डॉ. नरसिंग पुढे म्हणाले, यंदा राज्यात नव मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हे मतदार पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवा सैनिकांनी आपल्या मतदारसंघातील या नव मतदारांची माहिती मतदार यादीद्वारे घ्यावी. या सर्व मतदारांची यादी तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांची ध्येय- धोरणे व विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत, यामुळे जेणेकरून श्री शाहू छत्रपती यांना मोठे मताधिक्य मिळण्यास मदत होईल. ठाकरे कुटुंबीय आणि श्री शाहू छत्रपती यांच्याशी पिढ्यानपिढ्या असणारे ऋणानुबंध असेच टिकून राहतील, शिवसेना त्यांना पूर्ण ताकतीने विजयी  करेल असा शब्द पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी श्री शाहू छत्रपती यांना दिला आहे. प्रचाराला तर येणारच पण विजय सभेला पण नक्कीच येणार असे वचन देखील दिले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी श्री शाहू छत्रपती यांना दिलेला शब्द  व वचन पूर्ततेसाठी युवा सैनिकांनी मोठ्या जोमाने काम करावे. त्यामुळे १८ ते ३२ या वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन त्यांनी युवा सैनिकांना केले.


 

... मग आता गद्दाराला पाडण्यासाठी रक्ताचे पाणी करू


गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसैनिक व युवा सैनिकांनी रक्ताचे पाणी केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेत जनतेला आवाहन केल्याने त्यांना मोठे मताधिक्य मिळवता आले होते. मात्र त्यांनी शिवसेनेसोबतच गद्दारी केली. तेच गद्दार आज महाविकास आघाडीचे उमेदवार  श्री शाहू छत्रपती यांच्या विरोधात  निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे युवासैनिक यावेळी त्यांना पाडण्यासाठी रक्ताचे पाणी करतील असा निर्धार विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांनी या बैठकीत व्यक्त करत विरोधी उमेदवारावर टीकास्त्र सोडले.



मताधिक्य देण्यासाठी शिवसैनिकांनी झटावे : जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे  



जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वसामान्य, दीनदलित, बहुजनांसाठी केलेले कार्य हे संपूर्ण देशाला माहित आहे. महाविकास आघाडीकडून त्यांचेच वारसदार श्री शाहू छत्रपती हे निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे लोककल्याणाची तळमळ असणाऱ्या  राजर्षी शाहू महाराज यांच्या वारसदारांना विजय करून संसदेत पाठविणे हे तुमची- आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह युवा सैनिकांनी मतदारांपर्यंत त्यांचे विचार पोचवावेत व त्यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी झटावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांची भाषणे झाली. 



या बैठकीस युवा सेनेचे जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, उप जिल्हा अधिकारी प्रसाद पिलारी, महेश पाटील, चंदगड तालुका युवा अधिकारी राजकिरण सावडकर, जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.