प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने आंदोलन
गारगोटी तहसील कार्यालयासमोर 14 मे पासून आंदोलनाचा इशारा
भुदरगड : मोबदला न देता तलावाचे काम सुरू केल्याने भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली तांबाळे येथे शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
सोळा वर्षांपूर्वी या तलावाच्या कामाची सुरुवात करून ठेवली, मात्र बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनीचा, झाडा, बेटांचा, घरांचा मोबदला न देता पुन्हा 2024 झाली काम चालू केले. एखाद्या प्रकल्पाचे काम पाच वर्षात पूर्ण केले नाही तर सदर कामाची लागणाऱ्या जमिनीची पुन्हा संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मात्र शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काम पूर्ण करण्याचा यंत्रणेचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला अशी माहिती कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. 14 मे पासून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी सर्व बाधित शेतकरी एकत्र आले व गावात कॉ. शिवाजी गुरव यांना निमंत्रक म्हणून त्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. गुरव म्हणाले, जर 2024 साली वाहिवाटीचे पंचनामे करून कामाची सुरुवात केली असेल तर नवीन 2013 च्या भूमी संपादन कायदा प्रमाणे जमिनीचा खाजगी वाटाघाटीने बाजारभावाच्या चारपट रक्कम दिली पाहिजे किंवा रेडी रेकनरच्या पाचपट तसेच फळझाडांची किंमत त्या झाडांच्या फळाच्या उत्पन्नाच्या प्रमाणात त्या झाडांचे वय लक्षात घेऊन किमती केल्या पाहिजेत. 2013 च्या कायद्याप्रमाणे मोबदला मिळाल्यास शेतकरी विकासाला विरोध करणार नाहीत. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र कायमची पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन प्रकल्पासाठी द्यावी लागते. त्यामुळे योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, साईट वरून यंत्रणा हलवून काम बंद पाडले आहे. शेतकऱ्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने उपोषणाचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. गारगोटी तहसील कार्यालयाच्या दारात दिनांक 14 मे पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, प्रांताधिकारी आजरा- भुदरगड, पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.
निवेदनावर साठवण तलाव आंतुरली तांबाळे संघटनेचे अध्यक्ष अश्रू लाड, उपाध्यक्ष संजय कदम, जयसिंग लाड, राजकुमार देसाई, उमाजी कदम, अरविंद कदम, संतोष कदम, रामचंद्र पंदारे, तुकाराम पंदारे, कृष्णा पंदारे चंद्रभागा लाड, दशरथ कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.




