पुरेसा पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी
मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील कडगाव रोडवरील खणगावे नगर या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी येथील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चाचे चिटणीस सचिन खणगावे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कडगाव रोड, खाणगावे नगर येथे अलीकडे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी कमी मिळत आहे. मागील दोन महिन्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत होत होता, मात्र सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सध्या या परिसराच्या पश्चिम बाजूला दोन अपार्टमेंट झालेली आहेत. त्यांना पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर अपार्टमेंट असलेला भाग उतरतीला असल्याने पाण्याचा दाब हा त्या ठिकाणी जाऊन वरच्या भागातील लोकांना कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. या भागातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजप युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष भीमराव कोमारे, शहराध्यक्ष संग्राम हासबे, विद्यार्थी मोर्चा शहर अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह रोहिणी शेंडगे, अश्विनी चौगुले, स्नेहा गुरव, लता तानवडे, अरुण देशपांडे, अशोक चव्हाण, रंजना कांबळे, वंदना चव्हाण, सुधाकर शिंदे, रेशमा कुलकर्णी, आनंदा सुतार, महादेवी खणगावे, प्रकाश ढोणुक्षे, बाळासाहेब माने यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.

