आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे आवाहन
महागाव येथे तुफान गर्दीत महाविकास आघाडीची जाहीर सभा
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार व वारसा श्री शाहू छत्रपती यांच्या माध्यमातून दिल्लीत पोहोचणार आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन हलगीने नव्हे तर जोरजोरात बँड वाजवून दिल्लीत पोहोचवायचे आहे. या मताधिक्याद्वारे कोल्हापूरच्या मातीतील माणसाची अस्मिता, स्वाभिमान काय असतो हे दाखवून द्यावे असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री. पाटील पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कर्तुत्व कोल्हापूर जिल्ह्यासह देशभर पोचलेली आहे. या कर्तुत्वाचा ठसा विद्यमान श्री शाहू छत्रपती यांच्या माध्यमातून आता दिल्लीत पोचणार आहे. त्यांना दिल्लीत पोहोचवताना हलगीने नवे तर जोर जोरात बँड वाजवून पोहोचवावयाचे आहे. त्यामुळे त्यांना मोठे मताधिक्य आपल्याला द्यावयाचे आहे. त्यांना एवढं मताधिक्य दिलं पाहिजे की कोल्हापूरच्या मातीतल्या माणसाची अस्मिता व स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिले पाहिजे. हे करत असतानाच या मातीतून निवडून गेलेल्या गद्दारांना देखील आपल्याला धडा शिकवायचा आहे. ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवलं, शरद पवारांचा पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा मताद्वारे दाखवून द्यावे. लोकशाहीत मताची ताकद मोठी आहे. तुम्ही बटन दाबलं तर देशाचे परिवर्तन होणार आहे, महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे, अशा पद्धतीचे सरकार दिल्लीत आणण्याची भूमिका आपल्याला बजावायची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उमेदवार श्री. शाहू छत्रपती, विनायक उर्फ आप्पी पाटील, संजय करडे, दिलीप माने, अकलाकभाई मुजावर, रामराजे कुपेकर, गिरीजादेवी शिंदे, नितीन पाटील, अभिषेक शिंत्रे, गोपाळराव पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. किसनराव कुराडे, स्वाती कोरी, नंदाताई बाभुळकर यांची भाषणे झाली.
शाहू महाराजांना मतदान करण्याची संधीमुळे मतदार भाग्यवान!
ज्या गादीने आम्हाला सन्मान मिळवून दिला. मोठ्या ताठ मानेने उभे राहण्याच बळ दिलं. त्या गादीचा सन्मान, आदर राखण्याची संधी या लोकशाहीत मतदानाद्वारे आम्हाला मिळत आहे. आमची पिढी व मतदार भाग्यवान आहेत, कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांना मतदान करण्याची संधी मिळत आहे. ज्या शाहू महाराजांनी आपल्यावर अनंत उपकार केले. कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केला, त्यांच्या विचाराला, वारसाला मोठ्या मताधिक्याने दिल्लीत पाठविण्याचे आवाहन यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केले.
या सभेला प्रभाकर खांडेकर, संभाजीराव देसाई, विक्रमसिंह चव्हाण पाटील, महेश उर्फ बंटी कोरी, विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, बसवराज आजरी, बाळेश नाईक, दिग्विजय कुराडे, शिवाजीराव खोत, अमर चव्हाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







