जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, नगरपंचायतीला दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आजरा शहरातील संभाजी चौक ते भाई भाई चित्रमंदिर पर्यंत महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे तसेच शहरातील अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
प्रारंभी शहरातील बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता, नगरपंचायत मुख्याधिकारी, पोलीस ठाणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आजरा शहरात संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम संभाजी चौक ते भाई भाई चित्रमंदिर या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच शहरातील पाणीपुरवठा खंडित व अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे तातडीने विभागवार नळपाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे. संभाजी चौक ते एस.टी आगारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावण्यास बंदी घालावी व तसे 'नो पार्किंग'चे फलक लावण्यात यावेत, खासगी आराम बसेस शहराबाहेर उभे करण्याबाबत सूचना कराव्यात, नवीन नळ पाणीपुरवठा योजनेकरिता केलेले खोदकाम तातडीने मुजवून घ्यावे, ऐतिहासिक व्हिक्टोरिया पुलावर डागडुजी करून त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र तयार करावे, महामार्गासाठी प्रचंड वृक्षतोड झालेली आहे त्यामुळे पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवराज पवार, राजू रेडेकर, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, संजय येजरे, दयानंद भोपळे, महेश पाटील, ओमकार माद्याळकर, दिनेश कांबळे, नारायण कांबळे, सुनील डोंगरे, बाळू धामणकर, अरुण कांबळे, दिलीप पाटील, महेश खेडेकर, चंदू हरकरे, अमोल गुरव, रोहित डावरे, विष्णू रेडेकर, रवी खोराटे, अशोक लोहार, रवी सावंत, सागर नाईक, भिकाजी विभुते, महादेव सुतार, महादेव गुरव, प्रकाश गुडुळकर, विलास पाटील, निलेश पोवार, दत्ता पाटील यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



