हसुरसासगिरीच्या शांताबाई यादव ह्या स्वतः नाभिक व्यवसाय करणाऱ्या देशातील पहिल्या महिला
स्तुती काव्य करणारे कवी आनंदा आसवले तेरणी गावचे सुपुत्र
हसुरसासगिरी गावात पार पडला छोटेखानी कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : पती निधनानंतर पोटच्या चार मुलींना सांभाळण्यासाठी हातात वाटी-वस्तरा घेत स्वतः नाभिक व्यवसाय करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील हसुरसासगिरी या गावातील व देशातील पहिल्या महिला शांताबाई श्रीपती यादव यांच्यावर तेरणी गावचे सुपुत्र व कवी आनंदा दत्तू आसवले यांनी स्तुती काव्य करून त्यांचा सन्मान केला. हसुरसासगिरी ग्रामपंचायत कार्यालयात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच प्रदीप कडूकर उपस्थित होते.
कवी आनंदा आसवले हे मुळचे तेरणी गावचे. नोकरीनिमित्त ते कुटुंबासह मुंबई येथे राहतात. आपली नोकरी सांभाळत आनंदा कवितेचा छंदही जोपासतात. १९ सप्टेंबर २०२३ रोजी कवी आनंदा असवले यांचा 'जीवन प्रवास' नावाचा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहातील एकापेक्षा एक कविता वाचनीय आहेत. समाज काय म्हणेल याची भीती मनात न बाळगता मोठ्या धाडसाने व हसूरसागिरी ग्रामस्थांच्या पाठबळामुळे नाभिक व्यवसाय करत आपल्या चार मुलींचे पालन पोषण करून त्यांच्या पदरात सुख टाकणारी माऊली शांताबाई यादव ह्या महाराष्ट्रातील जेणेकरून गडहिंग्लजच्या भूमीतील आहेत, याचा अभिमान बाळगत कवी आनंदा आसवले यांनी त्यांच्यावर स्वरचित काव्य करण्याचे ठरविले. शांताबाई यादव यांच्या संघर्षमय जीवनावर मोजक्या शब्दात कविता करत त्यांचा जीवनपट त्यांनी उलगडला आहे. शांताबाई यादव यांच्या या संघर्षमय व धाडसी जीवन प्रवासाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेत खास राजधानी दिल्ली येथे त्यांना पाचरण करून त्यांचा सन्मान केला होता. अशा या माऊलीवर कविता करत त्यांचा गौरव केल्याबद्दल कवी आनंदा आसवले यांचे महाराष्ट्र राज्यात कौतुक होत आहे.
सदर स्तुती काव्याचे प्रमाणपत्र स्वरूपात प्रतिमा तयार करत शांताबाई यादव यांचा त्यांच्या हसुरसासगिरी या गावी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सरपंच प्रदीप कडुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतीत हे स्तुती काव्य शांताबाई यादव यांना प्रदान करण्यात आले. कवी आनंदा आसवले यांनी सदर स्तुतिकाव्याचे वाचन केले. हे काव्य ऐकून शांताबाई यादव भारावून गेल्या. कवितेच्या माध्यमातून आपला जीवनपट उलगडून सन्मान केल्याबद्दल त्यांनी कवी आसवले यांचे आभार मानले. यावेळी सरपंच प्रदीप कडुकर यांनी देखील या स्तुती काव्याचे कौतुक करत कवी आनंदा आसवले यांनी काव्याच्या माध्यमातून कर्तुत्ववान माऊलीचा केलेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास हसूरसासागिरीचे सरपंच प्रदीप कडूकर, तेरणीचे दुंडाप्पा नरेवाडी, पोस्ट मास्तर करवीर नवलगी, तेरणीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले, सदानंद आसवले, संभाजी मांगले, विनायक चौगुले, ग्रामसेवक जगन्नाथ चिंदके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे व्हिडिओ येथे पहा 👇




