शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचे प्रतिपादन
गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रा. कुराडे यांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रत्येक लेखक पुस्तके लिहितात, पण त्या पुस्तकाला वाचक मिळणे आवश्यक असते. ते मिळवून देण्याचे काम ग्रंथालयातील कर्मचारी करतात. म्हणून 'गाव तेथे ग्रंथालय' ही चळवळ टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी केले.
प्रा. कुराडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून 'जीवन गौरव पुरस्कार' मिळाल्याबद्दल गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
स्वागत ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी यांनी केले. यावेळी बोलताना प्रा. कुराडे पुढे म्हणाले, दरवर्षी शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथ महोत्सव ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात यावे. यासाठी शिवराज महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. गडहिंगलज तालुक्यातील प्रत्येक ग्रंथालयांना दरवर्षी ५० ग्रंथ शिवराज महाविद्यालयाकडून भेट स्वरूपात देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात सर्व स्तरातील वाचकांना पुस्तक वाचायला मिळतील व वाचन संस्कृतीला बळ मिळेल. ग्रंथालय कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यांना शासनमान्य वेतनश्रेणी मिळाली पाहिजे यासाठी आपण लोकसभा निवडणूक निकालानंतर शासन दरबारी प्रयत्न करणार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. कुराडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष सुभाष खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रा. कुराडे यांनी उपस्थित सर्व ग्रंथालयांना पुस्तक भेट दिले. यावेळी अध्यक्ष सुभाष खोत, उपाध्यक्षा अक्काताई शिंदे, कार्याध्यक्ष राजु भुईम्बर, सचिव सचिन ओहरा, खजिनदार शिवाजी मांगले, माजी अध्यक्ष श्रीपाद स्वामी, संदानद पाटील, सुवर्णा पाटील, विशाल रोटे, संतोष नलवडे, वंदना तोडकर, सुरज फुटाणे, गौतम माळी, रोहिणी सुतार यांच्यासह तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. आभार सचिव सचिन होरा यांनी मानले.



