कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे धडाडीचे नेते व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आधारवड आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील ( वय ७१, मुळगाव सडोली खालसा, तालुका करवीर, सध्या राहणार कोल्हापूर ) यांचे गुरुवारी सकाळी सहा वाजता उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहुल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी सडोली खालसा येथे होणार आहे.
रविवारी बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. चार दिवसापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या निधनाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यानी याबाबत फेसबुकवर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. सकाळी दहा वाजता काँग्रेस कमिटी कार्यालयात पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी दुपारी एक वाजता सडोली खालसा येथे होणार आहे.

