विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांची माहिती
प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी व बारावी (आर्ट्स) तसेच बी. ए. भाग एक, दोन व तीन हे पदवी शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमाभागात हा अभ्यासक्रम पहिल्यांदा सुरु होत आहे. यासाठी विद्या संकुलामध्ये सदरचा विभाग राष्ट्रपती पदक विजेते प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपणे सुरु करण्यात आला आहे. शिवाय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांद्वारे स्पोकन इंग्लिशचे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशी माहिती शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी दिली.
शिवराज विद्या संकुलामध्ये विद्यार्थी व पालकांची वाढती मागणी पाहून तसेच नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार विद्यार्थी हिताचा विचार करून चालू शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. खरेतर ग्रामीण विद्यार्थी हा इंग्रजी माध्यमातून शिकून तो स्पर्धा परीक्षेतून सक्षम झाला पाहिजे. त्याला बदलत्या परिस्थितीत येणाऱ्या नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहे. त्याला इंग्रजी शिक्षणाची जोड मिळाल्यास तो आपल्या करिअरमध्ये यशस्वी होईल यासाठी आजच्या काळाची गरज ओळखून संस्थेने हे नवीन पाऊल टाकले आहे. शिवराजच्या ज्ञान परंपरेत नव्या युगाची नांदी व्हावी आणि शिवराजीयन नव्या जगाचा वेध घेण्यास सक्षम व्हावा यासाठी ही विधायकता संस्थेने जपले असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
यासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व सर्व संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. महाविद्यालयात विद्यार्थी हिताच्या उपक्रमाला गती देण्यात येत आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी डॉ.महेश चौगुले व प्रा.विक्रम शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी केले आहे.

