कोल्हापूरच्या जनतेने मत आणि मान देखील गादीलाच दिल्याचे स्पष्ट
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती हे विजयी झाले आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. श्री शाहू छत्रपती यांनी 1 लाख 53 हजार 49 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरली. कोल्हापूरच्या जनतेने मत आणि मान देखील गादीलाच दिल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून श्री शाहू छत्रपती तर त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक रिंगणात होते. येथील लढतीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणी पासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती हे आघाडीवर राहिले. मताधिक्य वाढत गेले ते विजयापर्यंत कायम राहिले. मताधिक्य जसजसे वाढत गेले तसतसे कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.

