डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी भेट देवून केली पाहणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नांगनूरजवळ हिरण्यकेशी नदीवर राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाखालील मातीच्या भरावामुळे पावसाळ्यात मोठ्या पुराच्या काळात हिरण्यकेशीचा प्रवाह नांगनूर कडील बाजूला वळतो. या वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे नांगनूरकडील जमीन व रस्ता मोठ्या प्रमाणावर खचू लागला आहे. खचणारी शेतजमीन व रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, या नुकसानीची डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी भेट देवून पाहणी केली.
नदीपात्रात मोठे पिलर उभारले आहेत. पुलाचे बांधकाम करताना मोठा भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन नांगनूरकडील बाजूच्या नदीकाठावरील शेतकऱ्यांची जमीन खचत आहे. त्यामुळे नदीपात्र रुंदावत आहे. नांगनूर संकेश्वर प्रजीमा ६७ हा मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीवर पुलाचे काम करणाऱ्या अशोका इन्फ्रा कंपनीच्या व्यवस्थापकांशी बाभूळकर यांनी संपर्क साधला. पावसाळ्यात नांगनूरच्या शेतकऱ्यांच्या जमीनीचे आणि रस्त्याचे होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली व पुलाखाली नदीपात्रात असलेला भराव तात्काळ हटविण्याची मागणी केली.
नुकसानीच्या पाहणी प्रसंगी उदय जोशी, संजय मोकाशी, राजेंद्र मोकाशी, आप्पासाहेब नार्वेकर, गजानन मोकाशी, पिराजी नार्वेकर, राकेश पाटील, आप्पासाहेब पाटील, मारुती पाटील, सुभाष मिरजे, नारायण देसाई, ज्ञानप्रकाश रेडेकर, सत्यापा पाटील, अजित पाटील, किरण शिंदे यांच्यासह नांगनूरचे ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन ग्रामस्थांसमवेत चर्चा केली व नदीपात्रातील भराव हटवण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकार्यांना दिले.
निवेदनावर डॉ. नंदिनी बाभुळकर, उदय जोशी, राजेंद्र मोकाशी, संभाजी मोकाशी, रामचंद्र मोकाशी, नाना बामणे, वर्धमान चौगुले आदींच्या सह्या आहेत.


