खेळाद्वारे सर्वांगीण विकास- एटी फाऊंडेशन च्या प्रयत्नाला यश
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर येथील एटी फाऊंडेशनच्या वतीने कोचेस अक्रॉस काँटिनेंट्स व भारत विकास ग्रुप या स्वयंसंस्थेच्या सहाय्याने १५ ते १७ जून या कालावधीमध्ये गडहिंग्लज हायस्कूल येथे तीन दिवसीय स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट कोचेस ट्रेनिंग पार पडले.
गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील व पुणे, मुंबई, अहमदनगर, तासगाव येथून एकूण ३० जणांचा सहभाग होता. ट्रेनिंगमध्ये खेळाचे शिक्षक, फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक आणि एटी फाऊंडेशनचे लिडर्स यांचा सहभाग होता. या ट्रेनिंगसाठी कोचेस अक्रॉस कँटिनेंट्स या संस्थेकडून सरस्वती नेगी,(उत्तराखंड) व प्रविण कुट्टी (केरळ) इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहीले, तर गुलाफशा अंसारी(मुंबई) यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले.
खेळ हा मुलामुलींच्या तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे. खेळाद्वारे मुलांचा व समाजामधल्या विविध पैलूंचा विकास कसा घडवता येतो याबद्दल चर्चा करुन प्रात्यक्षिकाद्वारे या ट्रेनिंगमध्ये सहभागींना शिकवण्यात आले.
या ट्रेनिंगच्या सांगता समारंभवेळी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, एटी फाऊंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर आणि गडहिंग्लज हायस्कुलचे प्राचार्य पंडीत पाटील यांच्या हस्ते सहभागींना कंप्लीशन व पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडाशिक्षक अनिल पाटील यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान बोलताना अंजू तुरंबेकर म्हणाल्या, खेळामुळे मी घडले आहे व याद्वारे मला माझ्या मातीसाठी, माझ्या भागासाठी चांगले काहीतरी करायचे आहे, त्यासाठी प्रयत्न करत राहीन. प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात आणि ते आपण ओळखून त्यावर काम केले पाहिजे, मग यश तुमचेच असेल असे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी श्री. माने यांनी एटी फाऊंडेशनने केलेल्या कामाचा आढावा घेत कौतुक केले. अंजू तुरंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शिकण्यास मिळत असलेल्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे व सर्वांनी त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ घ्यावा असे सांगितले. त्यांनी खेळाचे महत्व पटवून देत आपल्या आयुष्याच्या वाटचालीचे अनुभव सांगून सर्वांना मेहनत करुन आयुष्य घडवण्यासाठी प्रेरीत केले.
राष्ट्रीय खेळाडू अंजू तुरंबेकर यांनी प्रथमच गडहिंग्लज येथे असा उपक्रम राबविला. यासाठी प्राचार्य पंडीत पाटील यांचे सहकार्य लाभले.
फाऊंडेशनचे अनिल पाटील, अमोल तुरंबेकर, अक्षय पावले, सम्राट चव्हाण, यशस्विनी बोराटे, शिवतेज पाटील यांनी परिश्रम घेतले.

