अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यात घरगुती व शेतीपंपासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) विरोध दर्शविला आहे. सदर मीटर बसविल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गडहिंग्लज येथील कार्यालयाला निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ग्राहकांच्या सेवेसाठी व ग्राहकांची हक्काची आहे. विजेचा वापर करणारे ग्राहक हे नित्यनियमाने वीज वितरण कंपनीचे पैसे भरतात. हे चालू असलेले चक्र विद्युत वितरण कंपनी व ग्राहकांच्या सोयीचे आहे. पण यामध्ये केंद्र सरकारकडुन खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक मीटरपाठीमागे ९०० रुपये इतके अनुदान देवून उर्वरित रक्कम कर्ज रूपाने उभी केली जात आहे. त्यामुळे कंपनीकडून सर्वसामान्य नागरीकांच्या खिशातून कर्जाचे व्याज, घसारा आदी खर्च वसुल करणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर शेती पंप व घरगुती वापरासाठी बसवण्याचा हट्ट करू नये. या प्रीपेड मीटरच्या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात एकही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू देणार नाही. सदर मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी तीन-चार वर्षापूर्वी मागणी करून देखील अनेक शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले आहे. त्यांना वीज जोडणी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनातून केली आहे.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, महिला तालुका संघटिका स्नेहल पाटील, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, उपतालुका प्रमुख सुधाकर जगताप, सुरेश हेब्बाळे, संजय पाटील, वसंत नाईक, शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवासेना तालुकाप्रमुख सागर हेब्बाळे यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

