Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिनकर खवरे सरांचे "सुविचार" वाचला ना? नाही वाचलंच पाहिजे!

सर्वांची सकाळ प्रसन्न करणारे, सकारात्मक ऊर्जा देणारे स्वलिखित "सुविचार" 


शिक्षकी पेशा सांभाळत कथाकार, कवी, समालोचक, सूत्रसंचालकाची भूमिका सांभाळणारे गडहिंग्लजच्या भूमीतील सुपुत्र 






गडहिंग्लज (संतोष नाईक): आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोनमुळे संपूर्ण जगच स्मार्ट झाले आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या घडामोडी या अँड्रॉइड मोबाईलद्वारे आपल्या हाताच्या बोटाने काही सेकंदात पाहता येतात. दररोज सकाळ -संध्याकाळ विविध ॲपच्या माध्यमातून सकारात्मक, मोटिव्हेशनल संदेश, सुविचार प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून दिवस प्रसन्नतेने घालवण्यासाठी एक नवी ऊर्जा देतात. या सुविचारांसाठी गुगलवर प्ले स्टोअरवर विविध ॲप देखील विकसित करण्यात आले आहेत. मात्र वाचकहो, गडहिंग्लज तालुक्याच्या भूमितील सुपुत्र प्राथमिक शिक्षक, कवी कथाकार व प्रसिद्ध सूत्रसंचालक दिनकर खवरे हे दररोज स्वतः आपल्या मनाने विविध सकारात्मक सुविचार लिहितात. आपल्याबरोबरच इतरांचा दिवसही आनंददायी जावा हा या पाठीमागे त्यांचा हेतू असतो. त्यांचे सुविचार वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाच्या मनात कितीही निराशा असले तरी वाचताक्षणी काही क्षणात त्यांच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निश्चितच दिनकर खवरे सरांचे हे सुविचार प्रत्येकाने आवर्जून वाचावे असेच आहेत. यानिमित्ताने 'जीबी न्यूज'च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला, माहिती जाणून घेतली. 




कथाकार, सूत्रसंचालक दिनकर काशिनाथ खवरे यांचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे होय. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची  व क्रिकेटची प्रचंड आवड होती. वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे साहजिकच लेखनाची आवड देखील त्यांना निर्माण झाली. त्यातूनच सूत्रसंचालनाची कला त्यांनी अवगत केली. 1992 पासून ते विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, क्रिकेटचे समालोचन करतात. शिक्षक नेते मधुकर येसणे, शिक्षक महावीर मरजे जी. एम. कोरी, तसेच प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, बाबासाहेब देशमुख,  प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचे वारंवार त्यांनी  श्रवण केले. शब्दांचा उच्चार, ओघवती भाषा, आवाजातील चढ-उतार याचे बारकाईने ते निरीक्षण करत गेले. गेली अनेक वर्षे गडहिंग्लज येथे सुरू असलेल्या सानेगुरुजी व्याख्यानमालेतील अनेक दिग्गजांच्या व्याख्यानमालेला ते आवर्जून उपस्थित राहून ऐकत असतात. याचाही लाभ त्यांना झाला.



बारावीचे शिक्षण झाल्यानंतर मात्र  वाचनाची आवड श्री. खवरे यांनी वाढवली. डी. एड. काॅलेजमध्ये असताना मात्र लेखनाला सुरुवात केली. त्यातूनच कविता करत असताना सुरुवातीला पेन्सिलने लिहिणे, एकच कविता चार-पाच वेळा लिहून खोडून पुन्हा लिहिणे व त्यातून त्यांच्या कविता आकार घेऊ लागल्या. त्यानंतर 'बलिदान' नावाची पहिली कथा त्यांनी लिहिली. हे लिहीत असताना त्यांना माजी केंद्रप्रमुख मधुकर येसणे व गावातील सर्व मित्रमंडळींचे प्रोत्साहन मिळत गेले. जिल्हा परिषद शाळा कदमवाडी, केंद्र शाळा भडगाव, प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी व केंद्र शाळा उत्तुर या ठिकाणी कार्य करत असताना त्यांची लेखन कला आणखी बहरत गेली. क्रिकेटचे समालोचन मराठी व हिंदी या दोन भाषांतून सांगताना तर मला सर्वोच्च आनंद मिळत असतो असे श्री. खवरे सर सांगतात. केंद्रशाळा भडगाव येथे कार्य करत असताना इयत्ता सातवी शिष्यवृत्तीची सुरूवात व सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात सर्वांच्या मदतीने केली. हे कार्य करत असताना आपल्या अध्यापन कार्याकडे मात्र त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यातूनच अनेक संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले. त्यामध्ये कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा कागलचा सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक पुरस्कार, त्रिवेणी कला, सांस्कृतिक मंडळाचा जे. पी. नाईक गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार, एल. एस. तोरस्कर फौंडेशनचा उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार, स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांने त्यांना गौरविण्यात आले.



दिनकर खवरे यांना सामाजिक कार्याची खूप आवड असल्यामुळे सत्यमेव सेवा फाउंडेशनने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना दिली आहे. सनी वाचनालय, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, संत बाळूमामा मंदिर समिती, जीवन विद्या मिशन अशा अनेक ठिकाणी ते कार्य करत असतात. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करून विविध मार्गदर्शकांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाते. आजसुध्दा व्यक्तीमत्व विकास, राजा शिवछत्रपती, स्वामी विवेकानंद व सुत्रसंचालन कसे करावे? याबद्दल ते मार्गदर्शन करत असतात. श्री. खवरे यांनी अंगी वक्तशीरपणा, सतत कार्यात मग्न राहणे, वाचन, लेखन हे गुण बाणवले आहेत. विविध मासिक व दैनिकांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केले आहे.



दिनकर खवरे यांनी आतापर्यंत 145 कविता व  64 कथांचे लेखन केले आहे. हे करत असताना त्यांच्या कथेचा केंद्रबिंदू हा बळीराजा व त्याचे दारिद्र्य हेच आहे. शिवाय देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती व संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या बद्दल कथा सुद्धा त्यांनी लिहिल्या आहेत. तसेच ज्या कथेचा शेवट अतिशय दुःखात होतो अशा जवळपास वीस कथा लिहिलेल्या आहेत. म्हणूनच या सर्व कथा शब्दबद्ध करून "कथारत्न" व "आठवण" हे दोन कथासंग्रह व "काव्यरत्न" हा कवितासंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे.




त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगताना कथाकार दिनकर खवरे म्हणतात, एखादी कविता सुचली की, ती पटकन मिळेल त्या कागदावर लिहून ठेवणे, त्यातून मग दुरुस्ती करून ती पेन्सिलने लिहिणे आणि मनाची खात्री झाल्यावर मग पेनाने लिहून ती पक्की करणे यासाठी लेखनाचा हा प्रवास करताना वेळेकडे पाहून चालत नाही. जे विचार डोक्यात येतात ते लगेच शब्दबद्ध करण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे. यासाठी माझ्या परिवारातील सर्व सदस्यांनी सुद्धा मला अनमोल असे सहकार्य केले आहे. आज अनेक आध्यात्मिक सामाजिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना विविध क्षेत्रातील मान्यवर लेखक प्रवचनकार प्रबोधनकार यांचा मला जवळून सहवास लावतो. याचा मला खूप आनंद होतो याबद्दल मी खूप समाधानी आहे. एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लजच्या भूमीतील एका शिक्षकाने आपली शिक्षकी पेशा सांभाळत कथाकार, कवी, समालोचक, सूत्रसंचालक म्हणून करत असलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.